ओरोस : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांना आज बुधवारी (९ फेब्रुवारी) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला. नितेश राणे यांचा स्वीय सहाय्यक राकेश परब यांनाही जामीन मिळाला आहे.
मंगळवारी (८ फेब्रुवारी) जामीन मिळावा म्हणून आमदार नितेश राणे यांचे वकिल, जेष्ठविधीतज्ज्ञ सतीश मानशिंदे, वकील संग्राम देसाई यांनी युक्तिवाद केला होता. तर सरकारी पक्षाच्या वतीने वकील प्रदीप घरत, वकील साळवी यांनी युक्तिवाद केला होता. त्यानंतर आज निर्णय देतो असे न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार आज जामीन अर्जावर निर्णय देण्यात आला.
दरम्यान, नितेश राणेंना साक्षीदारांवर दबाव आणता येणार नाही, याशिवाय आठवड्यातून एकदा पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागणार आहे.