नवी दिल्ली : महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाडण्यासाठी ‘ईडी’ मार्फत आपल्यावर दबाव आणल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून राऊत यांनी ‘लेटरबॉम्ब’ फोडला आहे. यानंतर राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत त्यांच्याविरोधात कसा कट रचला जात आहे याची माहिती दिली. तसेच हे राज्यसभेच्या सभापतींना लिहिलेले पत्र हे ट्रेलर नाही. मुंबईत शिवसेना भवनात आपण पत्रकार परिषद घेणार आहोत आणि त्यानंतर ‘ईडी’च्या मुंबईतील कार्यालयाबाहेरही हजारो नागरिकांसमोर आपण पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार आहे, असा गंभीर इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रात ईडी आपला छळ करत असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्यास नकार दिल्यानंतर, सरकारी यंत्रणा माझ्या आणि कुटुंबाच्या मागे लागली आणि छळ करण्यास सुरुवात केली. ईडी सारखी तपास यंत्रणा आपल्या राजकीय धन्याची बाहुली बनली आहे. त्यांच्या बॉसने मला लपून राहण्यास सांगितले असल्याचे अधिका-यांनीच कबूल केले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आपण लिहिलेल्या पत्रावरून देशभरात पडसात उमटत आहे. जवळजवळ सर्वच प्रमुख नेत्यांकडून फोन आले आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड आणि छत्तीसगडच्या बाबतीत केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सरकारं पाडायची आणि जी प्रमुख नेते आहेत त्यांचा गळादाबायचा, त्यांना आवळायचा, त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करायचे, खोटे पुरावे निर्माण करायचे, त्यांना बदनाम करायचं, असे सगळे प्रकार सुरू आहेत. पण ते भ्रमात आहेत. आम्ही या दडपशाहीला जुमानणार नाही, असं राऊत म्हणाले
महाराष्ट्रात आघाडी सरकार आल्यापासून विरोधी पक्षांच्या वेदना समजू शकतो. त्यांनी राजकीय लढाई लढावी. पण ‘ईडी’च्या माध्यमातून ‘क्रिमिनल सिंडिकेट’ चालवलं जातंय. सध्या ईडी आणि इतर तपास यंत्रणा या भाजपच्या किंवा त्यांच्या मालकांच्या क्रिमिनल सिंडिकेटचा एक भाग बनल्या आहेत. आजचं हे जे पत्र आहे ना तो ट्रेलरही नाहीए. हे पत्र फक्त माहितीसाठी लिहिलं आहे. ट्रेलरही अजून यायचा आहे. ईडीचे लोकं कशा प्रकारे सिंडिकेट चालवतात, कशा प्रकारे यांचे आर्थिक घोटाळे आहेत आणि कशा प्रकारे यांच्याकडून मनी लाँड्रींग होतंय आणि ब्लॅकमेल करतात, धमक्या देतात, पैसे गोळा करतात, यांचे वसुली एजंट आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
ठाकरे परिवाराला बदनाम करताहेत, शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना बदनाम करत आहेत, आमच्या सारख्या प्रमुख नेत्यांना बदनाम करत आहेत. महाराष्ट्रातही तपास यंत्रणा आहेत. आता त्या तपास करतील अधिक. मुंबईचे पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस यांच्यावर तुम्ही आहात का? तुम्ही संघराज्य रचनेची वाट लावताय. हुकूमशाही पद्धतीने काम करताय. यामुळे संपूर्ण यंत्रणेची पोलखोल करावी लागे, असा इशारा राऊत यांनी दिला.
आताच मी मुख्यमंत्री उद्धव ठाकेर आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली. पश्चिम बंगालमधील नेत्यांसह इतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांशीही चर्चा केली आहे. एवढचं सांगतो, ही एक सुरवात आहे, असा सूचक इशारा राऊत यांनी दिला.
पवार कुटुंबाच्या घरी ५ दिवस जाऊन हे ईडीचे अधिकारी बसले होते. ते सांगायचे या नेत्याचं नाव घ्या, त्या नेत्याचं नाव घ्या. हे पवार कुटुंबीयांच्या बाबतीत घडलं. हे आमच्या बाबतीत घडतंय. तुम्हाला काय वाटतंय आम्ही गुडघे टेकू, अजिबात नाही, असं राऊत बोलले.
अनिल देशमुखांच्यासोबतच्या कोठडीत तुम्हाला पाठवू, अशी भाषा भाजपचे बिनबुडाचे नेते करत आहेत. आम्ही जाऊ. दादागिरी तुम्ही करताय. पण पाठोपाठ त्याच कोठडीत तुम्हालाही खेचू. कारण तुमची पाप अधिक आहेत आणि आम्ही शुद्ध आहोत. आम्ही घाबरत नाही तुम्हाला, असं राऊत म्हणाले.
सरकार पाडण्याच्या धमक्या अनेक नेते जाहीरपणे देत आहेत. पण ते शक्य होत नाहीए म्हणून आमच्या सारख्या नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय. ईडीला ज्या कायदेशीर कारवाया करायच्या आहेत, त्या त्यांनी कराव्यात. पण तुमचाही नकाब उतरवल्याशिवाय राहणार नाही. ‘ईडी’च्या कार्यालयात काय चाललं आहे? याचे सूत्रधार कोण आहेत, हे मी लवकरच उघड करणार आहे, असं ते म्हणाले.
जबरदस्ती करतात हे लोकं. दादागिरी करतात, तेही मुंबईत. महाराष्ट्राच्या नागरिकांना बेकायदेशीरपणे डांबून ठेवतात. बाहेरच्या एजन्सी येतात, धमक्या देतात दोन-दोन दिवस, १२-१२ तास डांबून ठेवतात. हे वसुली एजंट सुपाऱ्या घेऊन येतात. यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, मुंबई पोलीस लवकरच कारवाई करणार आहेत. ज्यांना धमक्या दिल्या गेल्या ते काहीजण यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार आहेत. मुंबई पोलिसांनी त्यावर कारवाई करावी, असं आवाहन राऊत यांनी केलं.
माझ्या मुलीच्या लग्नासंदर्भात फुलवाल्याला उचलून आणतात, डेकोरेटरला उचलून आणतात. हे ईडीचं काम आहे. त्याला म्हणतात किती पैसे मिळाले? त्याने सांगितले त्या कुटुंबाशी आपले संबंध आहेत, यामुळे पैसे घेतले नाहीत, असे त्याने ईडीला सांगितले. पण बंदुकीचा धाक दाखवला गेला, तुरुंगात टाकण्याची धमकी दिली गेली. ही दादागिरी काय दाखवता, ही मुंबई आहे हे लक्षात ठेवा. आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे, असं राऊत यांनी ठणकावलं.
या मागचे सूत्रधार कोण आहेत तुम्ही पाहाच. ईडी ऑफिसमध्ये बेकायदेशीरपणे जाऊन कोण लोकं बसतात? कोण ऑपरेट करतंय? ईडीच्या कार्यालयात इतरांना प्रवेश नाहीए ना. मग हे दोन तीन लोकं आहेत. ते बसतात. ते ईडीला आदेश देतात. काय करायचं आणि काय नाही. कोणाला टॉर्चर करायचं हे सांगतात. देवेंद्र फडणवीसांना आव्हान देतोय, त्यांना माहिती मला काय सांगायचंय ते, असा इशारा राऊत यांनी दिला.
हे सरकार पडणार नाही. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील. ठाकरे कुटुंबालाही भयंकर त्रास दिला जातोय. खोटे पुरावे निर्माण करताहेत आहेत. रोज सकाळी एक माणूस उठतो आणि बेवड्या सारखा बडबडतो आणि त्याच्यावर ईडी कारवाई करते. आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही, असा इशारा संजय राऊत यांननी दिला.
‘…तर तुमचा लालूप्रसाद यादव करु’
मध्यावधी निवडणुकीसाठी सहकार्य न केल्यास तुरुंगात टाकू, असे सांगण्यात आल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला. काही लोक माझ्याकडे आले होते आणि महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे सांगत होते. राज्यात मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी त्यांना मला साधन बनवायचे होते. मला माहित होते की हे नकार दिल्याबद्दल मला मोठी किंमत मोजावी लागेल, तरीही मी नकार दिला.
राज्यातील सरकार अस्थिर करुन मध्यावधी निवडणुकांसाठी प्रयत्न सुरु आहेत. या सगळ्यात मदत करावी, असे मला सांगण्यात आले. अशा कोणत्याही प्रकारच्या गुप्त अजेंड्याचा भाग होण्यास नकार दिल्यानंतर मला धमकावण्यात आले. तुम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागेल, अशी धमकीही मला देण्यात आली. इतकंच नाही तर, तुमचे यापुढील दिवस हे एका माजी रेल्वेमंत्र्यांसारखे होऊ शकतात, ज्यांनी अनेक वर्षे तुरुंगात घालवली आहेत, असंही धमकावण्यात आल्याचं संजय राऊत यांनी पत्रात नमूद केलं आहे.
मुलीच्या लग्नानंतर डेकोरेटर्स, फुलवाल्याला ‘ईडी’कडून धमक्या
२९ नोव्हेंबर २०२१ रोजी माझ्या मुलीचे लग्न झाले होते. त्यानंतर ईडी आणि अन्य तपास यंत्रणांकडून लग्नासाठी सेवा पुरवणाऱ्या डेकोरेटर्स आणि इतर व्यावसायिकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांकडून या सगळ्यांना धमकावले आणि घाबरवले जात आहे. संजय राऊत यांनी तुम्हाला लग्नाच्यावेळी ५० लाख रुपये रोख दिले, असा जबाब देण्यासाठी संबंधित व्यावसायिकांवर दबाव आणला जात आहे. खोटी कबुली देण्यास नकार दिल्यामुळे ईडी आणि अन्य यंत्रणांच्या अधिकाऱ्यांकडून या सर्वांना सातत्याने त्रास दिला जात असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
“देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे मला काय सांगायचे आहे, आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही”
दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान दिले आहे. ईडीच्या माध्यमातून दादागिरी काय करता? ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे, तुम्ही पाहत राहा आता काय होणार आहे. ईडीच्या ऑफिसमध्ये दोन चार लोक जाऊन बसतात आणि सूचना आणि आदेश देतात. मी देवेंद्र फडणवीसांना आवाहन करत आहे आणि त्यांना माहिती आहे मला काय सांगायचे आहे. सरकार पाडण्यासाठी यानंतरही प्रयत्न होतील पण हे पडणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कुटुंबालाही खोटे पुरावे तयार करुन त्रास दिला जात आहे. रोज सकाळी एक माणूस उठतो आणि बेवड्यासारखा बडबडतो आणि त्यावरुन ईडी कारवाई करते. आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
इच्छा असेल तर कोठडीत जाऊ पण तुम्हालाही घेऊन जाऊ
ईडीचे लोक कशाप्रकारे सिंडिकेट चालवतात, यांचे स्वत:चे आर्थिक घोटाळे कसे आहेत, मनी लॉण्ड्रिंग करतात, ब्लॅकमेल करतात, धमकावतात आणि यांचे वसुली एजंट बाहेर आहेत हे पुराव्यानिशी सिद्ध करणार, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. कशाप्रकारे सरकारी यंत्रणांचा वापर करत विरोधकांचा आवाज दाबण्यात आला यासंबंधी नरेंद्र मोदींनी कालच राज्यसभेत सांगितलं. आता तर त्यांचं सरकार आणीबाणीपेक्षाही वाईट पद्धतीने राजकीय विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या सभापतींना याची माहिती देत पुढील लढाईला जावं यासाठी हे पत्र लिहिलं आहे. आम्हाला माहिती नाही असं त्यांना कोणी सांगू नये. कर्तव्य म्हणून हे पत्र लिहिलं आहे, असं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.
“पवार कुटुंबाकडे पाच दिवस जाऊन ईडीचे लोक बसले होते. नेत्यांची नावं घ्या असं त्यांचं म्हणणं होतं. हेच आमच्या बाबतीच घडत आहे. आम्ही गुडघे टेकू असं वाटतं का? हे भाजपाचे नेते वारंवार मला अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जावं लागेल असं सांगत आहे. तुमची इच्छा असेल तर कोठडीत जाऊ, पण लक्षात ठेवा आमच्या पाठोपाठ त्याच कोठडीत तुम्हालादेखील यावं लागणारआहे. कारण तुमची पापं जास्त आहेत. आम्ही शुद्ध आहोत. ईडीला कायदेशीरपणे ज्या कारवाया करायच्या आहेत त्या कराव्यात. पण मीदेखील ईडीच्या कार्यालयात काय सुरु आहे याचा पर्दाफाश कऱणार आहे,” असंही ते म्हणाले.
‘संजय राऊत यांचं पत्र बोलकं आहे’
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पाठवलेल्या लेटरबॉम्बवर राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते मुंबईत एका कार्यक्रमासाठी आले असताना प्रसारमाध्यमांकडून त्यांना संजय राऊत यांच्या पत्राविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, ‘संजय राऊत यांचं पत्र बोलकं आहे’. आदित्य ठाकरे यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली असली तरी संजय राऊत यांचा दिल्लीच्या पत्रकार परिषदेतील रौद्रावतार पाहता या मुद्द्यावरुन आता शिवसेना आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या सगळ्याचे जोरदार पडसाद उमटण्याचीही शक्यता आहे.