अर्थसंकल्पीय संसद अधिवेशन सुरू असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणावर विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांचा समाचार घेतानाच चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाची लक्तरे वेशीवर टांगली. तसेच सरकारच्या आताच्या धोरणांबाबत भूमिका स्पष्ट केली.
या भाषणात पंतप्रधानांनी देशातील एक सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला त्यांची जागा दाखवून दिली. काँग्रेस कायमच द्वेष करत आली आहे. विभाजनवादी मानसिकता काँग्रेसच्या डीएनएमध्ये घुसली आहे. इंग्रज निघून गेले. मात्र ‘तोडा आणि राज्य करा’ या नीतीला काँग्रेसने त्यांचे चरित्र बनवले आहे. काँग्रेस तुकडे तुकडे गँगची लीडर बनली आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. काँग्रेसची परंपरा शंभर वर्षांची आहे. मात्र सध्या त्यांची काय अवस्था आहे.
भाजपप्रणीत एनडीएचे सरकार अस्तित्वात आल्यापासून काँग्रेसची धुळधाण उडाली आहे. मागील दोन लोकसभा निवडणूक निकालांचा विचार करता २०१४मध्ये भाजपला ५४३ पैकी २८२ जागा मिळाल्या. १५व्या लोकसभेच्या तुलनेत त्यांनी १६६ जागा अधिक मिळवल्या. दुसरीकडे, काँग्रेसला अवघ्या ४४ जागांवर समाधान मानावे लागले. सध्या सुरू असलेल्या १६व्या लोकसभेमध्ये भाजपच्या खात्यात विक्रमी ३०१ जागा आहेत. सध्याची आकडेवारी पाहता भाजप खासदारांची संख्या काँग्रेसपेक्षा सहापट अधिक आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या लोकसभेत विरोधी पक्ष तोंडीस लावण्यापुरता आहे. लोकसभेपाठोपाठ देशातील अनेक राज्यांनी काँग्रेसला मागील मोठ्या काळापासून नाकारल्याचे मोदी यांनी आकडेवारीसह दाखवून दिले. सर्वात मोठा पक्ष असूनही देशातील सर्वात मोठ्या विधानसभेत म्हणजे उत्तर प्रदेशात काँग्रेसला दोन आकडी जागा मिळवता आलेल्या नाहीत. उत्तर प्रदेश, गुजरात, बिहारने १९८५ मध्ये काँग्रेसला मतदान केले होते, त्याला जवळपास ३७ वर्षे उलटून गेलीत. पश्चिम बंगालमधील लोकांनी काँग्रेसला जवळपास ५० वर्षांपूर्वी १९७२ मध्ये निवडले होते. ओदिशामध्ये गेली २७ वर्षे काँग्रेसला प्रवेश मिळाला नाही. गोव्यात १९९४ मध्ये पूर्ण बहुमतासह जिंकले होते. २८ वर्षांपासून गोव्यातील जनतेने ‘हाता’ला साथ दिलेली नाही. प्रत्येक पक्षाला राजकीय चढ-उताराला सामोरे जावे लागते. त्यामुळे काँग्रेस पक्ष उभारी घेऊ शकतो. मात्र मागील आठ वर्षांत त्यांचा आलेख वेगाने खालावत चालला आहे. काँग्रेसकडे सक्षम नेतृत्व नाही. सोनिया गांधी यांचा आता तितकासा प्रभाव राहिलेला नाही. अन्य वरिष्ठांना राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य नाही. घराणेशाहीमुळे अंतर्गत कुरबुरी वाढल्या आहेत.
कोरोनासारख्या जागतिक महामारीवेळी काँग्रेसने राजकारण केल्याचा आरोप मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशादरम्यान केला आहे. हा आरोप गंभीर आहे. पहिल्या लॉकडाऊन काळात संपूर्ण देश कोरोना नियमांचे पालन करत आहे, असा संदेश साऱ्या जगात जात होता. तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर लोकांना जाण्यासाठी सांगितले. तिकीट काढून दिले गेले. महाराष्ट्रातील ओझे कमी करा आणि जिथे कमी आहे तिथे म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये घेऊन जा, तुम्ही श्रमिक लोकांना मोठ्या त्रासात ढकलून दिले. कोरोना काळात तयार झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने पहिल्या दिवसापासून जे जे केले त्याविषयी काय काय बोलले गेले याला संसद साक्षीदार आहे. जगातील काही लोकांकडून भारताची बदनामी करणाऱ्या अशा गोष्टी बोलवून घेतल्या, असे मोदींनी यावेळी स्पष्ट केले. स्वातंत्र्य मिळाले तरी आपलीही जबाबदारी असते, याची आठवण करून देताना, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. सुशासनाची जबाबदारी केवळ सरकारची नाही. प्रत्येक राजकीय पक्षाचीही आहे, असे मोदी यांनी विरोधकांना सुनावले.
आत्मनिर्भर भारतासह अनेक लोकोपयोगी योजनांमुळे केंद्र सरकारचा उदो उदो होत आहे. हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्या लोकांना मोदी सरकारचे यश खुपते आहे. त्यामुळे महागाईचा आगडोंब झाल्याचे भासवले जात आहे. त्यावरही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना गप्प बसवले आहे. काँग्रेस काळात १० टक्क्यांपेक्षा अधिक महागाईचा दर होता. मात्र २०१४ नंतर महागाईचा दर हा ५ टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे. या वर्षी कोरोना असून सुद्धा महागाईचा दर हा ५.२ टक्के राहिला आहे. काँग्रेसच्या काळात शेवटच्या ५ वर्षांत महागाईचा आकडा दोन अंकांपर्यंत पोहोचला होता, हे लक्षात आणून दिले. इतकेच नव्हे तर महागाईवरून पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही हात झटकल्याची आठवण करून दिली. कधी कधी कोरियातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आपल्याकडे जाणवतो. वस्तूंच्या किमती वाढतात आणि नियंत्रणाच्या बाहेर जातात, या नेहरू यांच्या लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाच्या ओळी सांगितल्या. जगात सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्था आहे. १०० वर्षांपूर्वी महामारीमध्ये आजारापेक्षा भुकेने अधिक लोकं मेली. मात्र कोरोना काळात आम्ही कोणाला भुकेने मरू दिले नाही. ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिले, अशा शब्दांत मोदी यांनी भाजपप्रणीत एनडीएची कार्यपद्धती सर्वांसमोर मांडली.
कोरोना काळानंतर जग एका नव्या युगाच्या दिशेने जात आहे. स्वत:ला सिद्ध करण्याचा तसेच आत्मनिर्भर होण्याची योग्य वेळ आहे. संधी आपल्याला गमावून चालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वाखाली भारत महासत्तेच्या दिशेने जात आहे. अशा वेळी केवळ विरोधाला विरोध नको. यावेळी मोदी यांच्यासह केंद्र सरकारच्या जनकल्याणांच्या मोहिमेला विरोधी पक्षांकडून सक्षम साथ असायला हवी.