Monday, April 28, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यमहिलांनी प्रापंचिक समस्यांमधून कसा मार्ग काढावा?

महिलांनी प्रापंचिक समस्यांमधून कसा मार्ग काढावा?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे

घरोघरी मातीच्या चुली, या म्हणीनुसार खरंच समुपदेशनला आलेल्या प्रत्येक महिलेला सर्वसाधारणपणे एक सारख्याच समस्यांना तोंड द्यावे लागते आहे, हे लक्षात येते. नानाविध प्रश्न, विचार, शंका, बिघडलेली मानसिकता, पस्तावा, खचलेले मनोधैर्य आणि डगमगलेला आत्मविश्वास! हे सर्व का तर वैवाहिक, कौटुंबिक जीवन सुखी-समाधानी नसणे, घरात कोणीही आपल्याला समजून घेत नाहीये हा समज आणि याचा त्रास स्वतःला करून घेणे! वैवाहिक आयुष्यात स्त्रीला किंमत, आदर, मानसन्मान तर दिला जात नाहीये; परंतु सातत्याने तिच्यावर टीका केली जाते, तिच्याबद्दल वाईटच बोलले जात आहे, तिच्या चुका काढल्या जात आहेत, कुटुंबातील सदस्यच तिची बदनामी करीत आहेत, तिला सतत दोष दिला जातोय आणि तिच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जातोय, हे सर्वसाधारण चित्र काही महिलांना आपल्या घरात अनुभवायला मिळते आहे, हेच समुपदेशनला आलेल्या प्रकरणांमधून जाणवते.

वैवाहिक आयुष्य हे फक्त पती-पत्नीच्याच नात्यावर आधारित नसून कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या वागणुकीचे पडसाद त्यावर उमटत असतात. प्रत्येक महिलेचा असाच कयास असतो की, पती त्याच्या घरातील लोकांचे ऐकून माझ्याशी वाद घालतो अथवा पतीच त्याच्या तोंडाने सातत्याने माझी निंदा-नालस्ती करतो, चार लोकांत माझा अपमान करतो, मला नावं ठेवतो म्हणून घरचे पण माझी किंमत ठेवत नाहीत. दोन्ही गोष्टी महिलांना मानसिक यातना द्यायला कारणीभूत ठरतात. काही महिला पतीला तर काही महिला घरच्यांना जबाबदार धरतात. महिलांना प्रामुख्याने एका वेळी अनेक नात्यांचा, अनेक विषयांचा एकत्रित त्रास होत असतो असे दिसते. समुपदेशन दरम्यान अनेक महिला स्वतःच्या समस्यांची अधिकाधिक गुंतागुंत स्वतः करून घेत आहेत, असे जाणवते. समस्या कोणतीही असो, कोणापासून पण असो एक एक प्रश्न सोडविणे, त्यासाठी दिलेले मार्गदर्शन अमलात आणणे, ती समस्या बऱ्यापैकी दूर झाल्यावर दुसऱ्या विषयात हात घालणे आणि मग त्यातून मार्ग काढणे, समस्यांचा प्राधान्यक्रम ठरवणे आणि त्यानुसार अंमलबजावणी करणे अनेक विवाहित महिलांना जमत नाही.

प्रपंच म्हटला की, प्रत्येकाचे विचार वेगळे, स्वभाव वेगळे, वागणूक वेगळी. बहुतांश महिलांचा हाच आरोप असतो की, सासरचे सर्वजण एकत्र येऊन मला कायमच दोषी ठरवतात. महिलांना माहेरून देखील वेगवेगळे सल्ले मिळत असतात, त्यातून त्या अजून गोंधळून गेल्यासारखे वागतात आणि समस्या वाढत जातात.

कोणत्याही महिलेला सगळ्यांच्याच मनाप्रमाणे वागणे, घरातील सर्वांच्याच अपेक्षा पूर्ण करणे, सगळ्या बाबतीत स्वतःच तडजोड करणे अनेकदा शक्य होत नाही. त्यातून तिची घुसमट आणि चिडचिड वाढते, ती प्रत्युत्तर देऊ लागते आणि सगळ्यांसाठी अधिकच वाईट ठरते. अशा वेळी तिला एकटे पाडणे, तिला आपल्यात सामावून न घेणे, तिला परकेपणाची वागणूक देणे, टोमणे मारणे, यांसारखे प्रकार अनेक ठिकाणी केले जातात.

महिला जेव्हा कोणताही प्रश्न घेऊन समुपदेशनला येतात, त्यातून या ठरावीक समस्या महिलांना भेडसावत आहेत हे लक्षात येते. महिलांनी प्रथमतः भूतकाळात काय घडले, आतापर्यंत, आजपर्यंत काय घडले यावर सातत्याने विचार आणि चर्चा करणे टाळणे आवश्यक आहे. कोण काय बोलले, कोणी काय केले, कोण कसे वागले, कोणामुळे काय झाले या गोष्टींवर विचार करण्यात आणि तेच तेच उगाळण्यात महिला स्वतःच्या आयुष्यातील बहुमूल्य वेळ आणि ऊर्जा वाया घालवतात, असे जाणवते. मूलतः स्त्रीचा संवेदनशील, भावनिक स्वभाव असल्यामुळे प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणे, स्वतःला त्रास करून घेणे, एकच विचार परत परत करणे त्यांना मानसिक, शारीरिक दृष्टीने कमकुवत करते, कुढत बसणे, सतत रडणे, जेवणावर राग काढणे, मुलांवर राग काढणे यातून महिला अजून दुर्बल होत जाते.

सत्य परिस्थिती स्वीकारून वर्तमानात जगण्याची सवय महिलांनी स्वतःला लावून घेणे आवश्यक आहे असे वाटते. महिलांच्या मनात शंका देखील खूप असतात, सातत्याने द्विधा मनःस्थितीमध्ये वावरल्यामुळे त्यांना कोणताही ठोस निर्णय घेता येत नाही. त्याचप्रमाणे आपले दुःख, आपल्या समस्या कोणाला तरी सांगून मन मोकळे करणे महिलांना गरजेचे वाटते; परंतु अनेकदा आपण ज्या व्यक्तीजवळ आपलं संपूर्ण व्यक्तिगत आयुष्य उघड करीत आहोत, ती तेवढी पात्र आहे काय, याचा विचार महिलांनी केलेला नसतो. कोणत्याही चुकीच्या व्यक्तीसमोर आपले दुःख व्यक्त करून महिलांनी स्वतःच्या समस्या अधिकच वाढून घेतल्याचे जाणवते.

त्याचप्रमाणे खूपच पटकन कुटुंबातील एखाद्यावर विश्वास ठेवून अथवा नात्यातील कोणावर पूर्ण विश्वास टाकून स्त्रिया आपल्या भावना, आपले कोणाबद्दलचे मत, कोणाचाही आपल्याला आलेला कोणताही अनुभव बोलून टाकतात; परंतु याच वैयक्तिक विश्वासाने सांगितलेल्या घटना, घडामोडी सार्वजनिक पद्धतीने चर्चिल्या जातात आणि संबंधित महिलाच वाईट ठरते. अनेकदा महिलांना कोणत्याही कौटुंबिक विषयावर अर्धवट माहितीच्या आधारे मत बनवण्याची सवय असते, ते मत व्यक्त करण्याची घाई देखील तेवढीच असते. अशा स्वभावामुळे आपणच अडचणीत येतोय हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कोणावरही कोणताही आरोप करताना, कोणालाही दोषी ठरवताना त्याची पूर्ण खात्री आणि शहानिशा करणे महिलांसाठी उपयोगी राहील. फक्त स्वतःच्याच दृष्टिकोनातून विचार न करता इतरांच्या देखील विचारांचा, मतांचा आदर करणे, निदान त्याला ताबडतोब विरोध न करणे हे पथ्य महिलांनी पाळणे आवश्यक वाटते.

त्याचप्रमाणे आपल्याजवळ देखील कोणीही कुटुंबातील, नात्यातील व्यक्ती काही बोलली असेल, ती गोष्ट खासगी राहणे आवश्यक असेल, तर महिलांनी ती मनात ठेवणे आवश्यक आहे. लावालावी करणे, एखाद्याच्या माघारी निंदा करणे, कोणाचे कान भरणे यांसारख्या गोष्टी महिलांनी कटाक्षाने टाळणे आवश्यक आहेत. अशा चुकीच्या सवयींमुळे आपणच इतरांचा रोष ओढवून घेतो आणि प्रापंचिक समस्या अधिक वाढतात.

अनेक महिलांना स्वतःच्या संसाराची तुलना इतरांशी करण्याची सवय असते. चारचौघांत देखील आपल्या पतीचा, घरच्यांचा उद्धार करायला, त्याला कमी लेखायला महिला मागे-पुढे पाहत नाहीत. सातत्याने आपल्याकडे जे नाही, त्याबाबत तक्रार आणि नाराजी व्यक्त करून स्वतःलाच दुःखी करून घेण्यापेक्षा महिलांनी जे मिळाले आहे, त्याचा उपभोग घेणे उचित राहील. सांसारिक समस्या वाढीला लागण्याचे मुख्य कारण आज-काल मोबाइल फोन, सामाजिक माध्यम हे असल्याचे जाणवते. आपल्या घरातल्या व्यक्तींना पुरेसा वेळ देणे देखील त्यामुळे अशक्य होते आहे. त्यामुळे मोबाइलचा वापर करताना सर्वतोपरी काळजी घेऊन वादविवाद टाळणे महिलांच्या हातात आहे.

अनेकदा वाद आणि भांडणे वाढण्याचे कारण हे सतत प्रत्युत्तर देणे असते. कोणीही माघार घ्यायला तयार नसणे आणि शब्दाने शब्द वाढणे यामुळे मनं दुखावली जातात आणि नात्यातील अंतर वाढते. माझी चूक नाही, मी का ऐकून घेऊ किंवा मीच का शांत राहू या स्वभावामुळे आपण सगळ्यांच्या मनातून उतरतो. त्यामुळे निदान अशा प्रसंगी स्वतःला संयम घालणे, शांत राहणे यालाच प्राधान्य द्यावे. कालांतराने वातावरण निवळल्यावर आपण आपले मत, विचार मांडू शकतो.

महिलांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, आपणच आपल्या आयुष्याला सकारात्मक करू शकतो. कोणीही केलेली निंदा, वापरलेले दुखावणारे चुकीचे शब्द, नानाविध आरोप, टोमणे, हेवे-दावे हे लक्षात ठेवून आपल्या मनात, डोक्यात हा नकारात्मक कचरा साठवून ठेवण्यापेक्षा झालेल्या गोष्टी, घडलेल्या अप्रिय घटना तिथेच त्याचवेळी सोडून द्या. त्यातून फक्त जे चांगले, जे योग्य आणि आपल्या हिताचे आहे तेच घ्या आणि पुढे चला. आपल्या आयुष्याला सतत नावीन्यपूर्ण दर्जेदार संभाषण, सकारात्मक लोकांचे मार्गदर्शक विचार, संयम यातून घडवा.

ज्या व्यक्ती, ज्यांचे बोलणे, ज्यांचे विचार तुम्हाला त्रासदायक ठरतात, ज्यांच्याकडून शिकण्यासारखे किंवा घेण्यासारखे काहीही नाही, शक्यतो अशा लोकांपासून स्वतःला दूर ठेवा. मग ते कुटुंबातील असोत, नात्यातील असोत, शेजारी असोत अथवा मित्र-मैत्रिणी असोत. आपल्याला जे समजावून आणि सामावून घेऊ शकत नाहीयेत, आपण कित्येक वेळा पडती आणि नमती बाजू घेऊन देखील जे स्वतःला बदलत नाहीत, जे स्वतःचेच खरं करण्याचा अट्टाहास करीत आहेत, ज्यांच्या विचारात वागण्याबोलण्यात सुधारणाच होत नाहीये, त्या व्यक्ती आपली कदर आणि आदर करीत नाहीत हे स्पष्ट आहे.

सातत्याने आरडाओरडा करणाऱ्या, मोठ्याने बोलणाऱ्या सतत दुसऱ्याला दोष देऊन नावे ठेवणाऱ्या, दटावून स्वतःच खरं करणाऱ्या, चुकांना पाठीशी घालणाऱ्या व्यक्ती मुळात हरलेल्या असतात. त्यांना स्वतःच्या मानसिक समाधानासाठी, मीच कसा बरोबर आहे, हे दाखवण्यासाठी अशा वागणुकीचा आधार घ्यावा लागतो. ज्याची बाजू खरी असते, सत्य असते तो कधीच ओरडून बोलत नाही, दुसऱ्याला जबाबदार धरत नाही

आपल्याला समजावून घेण्याची समोरच्याची पातळी नाही, तो आपल्या वैचारिक बौद्धिक मापात बसत नाही समजून पूर्णतः दुर्लक्ष कारणेच हिताचे राहील. अशा पद्धतीने आपल्याच स्वभावात थोडे बदल करून आपण समाधानकारक प्रापंचिक आयुष्य जगण्याचा प्रयत्न का करू नये?

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -