Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

एकमेकांच्या चुका पोटात घालायच्या आहेत का? - सुधीर मुनगंटीवार

एकमेकांच्या चुका पोटात घालायच्या आहेत का? - सुधीर मुनगंटीवार

मुंबई : “आम्ही जेलमध्ये गेल्यास तुम्हालाही आत टाकू हे वाक्यच घटनेच्या चौकटीत गांभीर्याने घेतलं पाहिजे. याचा अर्थ आम्ही चुका करतो, तुम्ही दुर्लक्ष करा, आम्ही करतो. देशाच्या स्वातंत्र्याचा मंगलकलश हा गुंडाराजसाठी दिला आहे का? उद्या कोणीही कोणत्या पक्षाचा चुकत असेल तर आमची चौकशी थांबवा, आम्ही तुमची करणार नाही, ही वाटाघाडी जनतेला कशी पटेल? एकमेकांच्या चुका पोटात घालायच्या आहेत का?,” अशी विचारणा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.


“ज्याचं हातावर पोट आहे तो तुमच्यावर विश्वास टाकून मतदानासाठी दोन दोन तास रांगेत उभा राहतो, भारतमाता की जय म्हणतो आणि तुम्ही सौदेबाजी करता. आज महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे. सुडाच्या राजकारणाबद्दल बोलता आणि तुम्ही नारायण राणेंवर गुन्हा दाखल केला. बाळासाहेबांना अटक करणाऱ्या छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसलात आणि आम्हाला तत्वज्ञान देता,” असंही यावेळी ते म्हणाले.


“संजय राऊतांना महाराष्ट्राची जनता गांभीर्याने घेत नाही. त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या माहिती नाहीत. ते राज्यसभेचे सदस्य आहेत, पण ज्या पद्धतीने ते भाष्य करतात त्यामुळे ते राज्यसभेचा गौरव वाढवत नाहीत. राज्यसभेच्या सदस्याची उंची कशी नसावी याचं हे एक मूर्तीमंत उदाहरण आहे,” अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.


“शिवसेनेचा जो दबदबा होता तो आता राहिलेला नाही. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण म्हणणारी शिवेसना आता १०० टक्के राजकारणात गेली आहे. बाळासाहेबांची शिवसेना संपवण्यासाठीची ही पत्रकार परिषद होती,” असंही सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment