मुंबई (प्रतिनिधी) : भारताच्या सीनियर संघातील जागा पुन्हा एकदा मजबूत करण्याच्या निर्धाराने माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे हा रणजी करंडक स्पर्धेत खेळणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) जाहीर केलेल्या मुंबई संघात अजिंक्यचा समावेश करण्यात आहे. पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखालील संघात महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन याचाही समावेश आहे. १७ फेब्रुवारीपासून रणजी करंडक स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
राष्ट्रीय संघातील दावेदारी पेश करण्यासाठी अजिंक्यला रणजी करंडक स्पर्धेत खेळावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अजिंक्य रहाणेला ६ डावांत १३६ धावा करता आल्या आहेत. तीन सामन्यांच्या मालिकेत रहाणेनं ४८, २०, ०, ५८, ९ व १ अशा धावा केल्या होत्या. रहाणेनं २०२० मध्ये अखेरचं शतक झळकावलं होते. रहाणेनं २०२० व २०२१ मध्ये अनुक्रमे ३८.८५ व १९.५७च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. त्याने मागील १४ सामन्यांत २०.८४च्या सरासरीनं ५२१ धावा केल्या आहेत. त्यामुळे रहाणेसह चेतेश्वर पुजारा यांना रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याचा सल्ला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिला होता.
दोघे खूप चांगले खेळाडू आहेत. पुन्हा फॉर्म मिळवताना रणजी करंडक स्पर्धेत खेळून खोऱ्यानं धावा करतील, अशी मला खात्री आहे. इतकी वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळल्यानंतर पुन्हा स्थानिक स्पर्धेत खेळण्यात काहीच समस्या नाही. तशी मला तरी जाणवत नाही. रणजी करंडक स्पर्धा ही मोठीच स्पर्धा आहे आणि आम्ही सर्व या स्पर्धेत खेळलो आहोत. त्यामुळे या दोघांनीही जावं आणि दमदार कामगिरी करावी. त्यांनी आधीही रणजी करंडक स्पर्धा खेळली आहे, असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले आहे.
मुंबईचा रणजी संघ : पृथ्वी शॉ ( कर्णधार), अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, आकर्षित गोमेल, अरमान जाफर, सर्फराज खान, सचिन यादव, आदित्य तरे ( यष्टिरक्षक), हार्दिक तामोरे ( यष्टिरक्षक), शिवम दुबे, अमन खान, शाम्स मुलानी, तनुष कोटियान, प्रशांत सोलंकी, शशांक अत्तार्डे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, प्रिन्स बदियानी, सिद्धार्थ राऊत, रॉयस्टन डायस, अर्जुन तेंडुलकर.
रणजी स्पर्धेची रूपरेषा
१० फेब्रुवारीला रिपोर्टिंग
१० ते १४ फेब्रुवारी क्वारंटाईन
१५ व १६ फेब्रुवारी सराव
१७ ते २० फेब्रुवारी पहिल्या फेरीचे सामने
२४ ते २७ फेब्रुवारी दुसऱ्या फेरीचे सामने
३ ते ६ मार्च तिसऱ्या फेरीचे सामने
७ ते १० मार्च उपांत्यपूर्वपूर्व फेरीपूर्वी क्वारंटाईन
११ मार्च सराव
१२ ते १६ मार्च उप उपांत्यपूर्व फेरीचे सामने