मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा घसरला असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक सातत्याने खाली जात असून सोमवारी मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक अति वाईट नोंदवला गेला आहे. धुळीच्या वादळाचा हा फटका असून वातावरणीय बदल यासाठी कारणीभूत असल्याची माहिती सफर या संस्थेचे संचालक डॉ. गुफरान बेग यांनी दिली.
गेल्या आठवडाभरापासून मुंबईतील हवेचा दर्जा खालावत असून माझगाव परिसरात सर्वाधिक प्रदूषण नोंदवले गेले आहे. तेथील हवा गुणवत्ता निर्देशांक ४२६ सह पीएम २.५ ‘तीव्र प्रदूषण’ असा नोंदवला गेला. कुलाबा, मालाड, चेंबूर आणि अंधेरीमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक ‘अतिशय वाईट’ नोंदवला गेला. या भागात पीएम २.५ सह कुलाबा ३४८, मालाड ३४६, चेंबूर ३१६ आणि अंधेरीमध्ये ३०६ हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला.
मुंबईतील भांडुप २३९, वरळी २६९, बोरिवली २४६ तर नवी मुंबईत २२० हवा गुणवत्ता निर्देशांकासह हवेचा दर्जा ‘वाईट’ नोंदवला गेला. बोरिवली, बीकेसी आणि नवी मुंबई या परिसरात पीएम १० ची नोंद झाली आहे. मुंबईतील प्रदूषित परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीकेसी परिसरात इतर परिसराच्या तुलनेने कमी प्रदूषणाची नोंद झाली या भागात पीएम १०सह हवेचा दर्जा मध्यम नोंदवला गेला. मुंबईतील कुठल्याही परिसरामध्ये समाधानकारक हवेची नोंद झाली नाही.