उदित नारायण, सुप्रसिद्ध गायक
लता मंगेशकर… साक्षात गानसरस्वती… लताजींना ऐकतच मी लहानाचा मोठा झालो. मी शेतकरी कुटुंबातला मुलगा. त्यामुळे मुंबईला येण्याचा, लताजींना भेटण्याचा तसंच त्यांच्यासोबत गाण्याचा मी कधी विचारही केला नव्हता. लताजींसोबत गायला मिळणं हे माझं अहोभाग्य. हे खरंतर एखाद्या स्वप्नासारखंच आहे. या सुंदर स्वप्नातून कधी जागं होऊ नये, असं मला वाटतं. लताजींच्या रूपात माझ्या डोक्यावर कायम सरस्वतीचा वरदहस्त राहिला आहे. साक्षात लताजींसोबत गाण्याची संधी मिळावी, असं प्रत्येक गायकाला वाटत असतं. माझ्या बाबतीतही तसंच होतं. मला ती संधी मिळाली. मी लताजींसोबत असंख्य गाणी म्हटली आणि ती प्रचंड गाजली. त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. लताजींसोबत गाताना मी समृद्ध होत गेलो. त्यांच्याकडून मला खूप काही शिकता आलं. गाण्यातले बारकावे समजले. लताजींसोबतच्या अनेक आठवणी आहेत, अनेक किस्से आहेत.
लताजींसोबतच्या माझ्या पहिल्या गाण्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. मी त्यावेळी अगदीच नवखा होतो. वेगवेगळ्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जात होतो. लताजींना गाताना बघत होतो, ऐकत होतो. त्या काळात पंचमदांशी माझी थोडीफार ओळख झाली होती. मी त्यांच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जात असे. असंच एकदा मला लताजींसोबत चार ओळी गाण्याची संधी देऊन बघू या, असं त्यांच्या मनात आलं. त्यांनी मला विचारलं. लताजींसोबत गाण्याची संधी मिळणार म्हणून मी भलताच खूश झालो. पण लताजींनी ते गाणं आधीच म्हटलं होतं. मला फक्त गाण्यातल्या चार ओळी म्हणायच्या होत्या. पंचमदांसह सगळ्यांनीच मला प्रोत्साहन दिलं, आत्मविश्वास वाढवला. ‘जीवन के दिन छोटे सही, हम भी बडे दिलवाले…’ हे ते गाणं. मी आत्मविश्वासाने ते म्हटलं. सगळ्यांनी माझं कौतुक केलं. त्यामुळे माझ्याही अंगावर मूठभर मांस चढलं. अर्थात लताजींना त्यावेळी याची अजिबात कल्पना नव्हती. एका नवख्या गायकाने या ओळी म्हटल्याचं त्यांना नंतर कळलं. या गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर एका कार्यक्रमात त्यांना भेटण्याचा योग आला. मी त्यांना वाकून नमस्कार केला आणि या गाण्याविषयी सांगितलं. त्यांनीही माझं कौतुक केलं. माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि भविष्यात असंच चांगलं गात राहा, असं म्हणून पुढे गेल्या.
यानंतर लताजींसोबत गाण्याची अजून एक संधी चालून आली. महेश भट्ट यांच्या ‘सातवां आसमान’ या चित्रपटाला राम-लक्ष्मण संगीत देत होते. या चित्रपटातलं ‘तुम क्या मिले जानेजां, प्यार जिंदगी से हो गया’ हे गाणं मी लताजींसोबत गायलं. यावेळीही लताजींनी माझं तोंडभरून कौतुक केलं. माझं गाणं उत्तम झाल्याची पावती दिली. यानंतर लताजींसोबत गाण्याची संधी सातत्याने मिळत गेली. ‘कयामत से कयामत तक’ची गाणी तुफान गाजल्यानंतर माझ्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीची कवाडं खुली झाली. मला ‘डर’ या चित्रपटासाठी यश चोप्रांनी संधी दिली. मग ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’, ‘ दिल तो पागल है’, ‘वीर झारा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये मी लताजींसोबत गाणी म्हटली. लताजींसोबत मिळालेली गाण्याची संधी ही माझ्यावर झालेली परमेश्वराची कृपाच म्हटली पाहिजे. लताजींनी किशोरदा, रफी साहेब, मुकेशजींसोबत असंख्य गाणी म्हटली. ही मंडळी आमच्यासाठी आदर्श आहेतच. मात्र आमच्या पिढीतल्या गायकांमध्ये मी स्वत:ला अत्यंत नशीबवान समजतो. मी लताजींसोबत २५० ते ३०० चित्रपटांसाठी गायलो. आमची जवळपास ९० टक्के गाणी गाजली.
मला ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’च्या गाण्यांच्या रेकॉर्डिंगदरम्यानचा एक प्रसंग आठवतो. मी रेकॉर्डिंग स्टुडियोमध्ये पोहोचलो तेव्हा लताजी, यश चोप्रा, त्यांच्या पत्नी, संगीतकार जतीन-ललीत तसंच अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती. ‘मेहंदी लगाके रखना, डोली सजाके रखना’ या गाण्याचं रेकॉर्डिंग होतं. स्टुडिओमध्ये प्रवेश करताच मला लताजींचं दर्शन झालं. मी खाली वाकून नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. मीही सगळ्यांसोबत बसलो. तेवढ्यात लताजी म्हणाल्या, ‘उदित आज मी तुझं गाणं इथे बसून ऐकणार आहे. तू गाणं म्हण’. मी पुरता गोंधळून गेलो. काय बोलावं हे कळेना. तुमच्या स्वरूपात साक्षात सरस्वती इथे विराजमान असताना मी गाणं कसं म्हणू, असं मी त्यांना म्हणालो. पण, लताजी काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हत्या. काहीही झालं तरी आपण समोर बसून गाणं ऐकणार, असं त्या म्हणाल्या. अर्थात त्या दिवशी लताजींनी माझं गाणं ऐकण्याचा हट्ट काही सोडला नाही. तुझं गाणं ऐकल्याशिवाय मी इथून जाणार नाही, असं म्हणाल्या. माझा नाईलाज झाला. मी प्रयत्न करतो. काही चूकभूल झाली तर मला क्षमा करा आणि डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्या, असं मी त्यांना म्हणालो. माझा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहे. तू गाणं म्हण, असं म्हणत त्यांनीही मला प्रोत्साहन दिलं आणि मी ‘मेहंदी लगाके रखना’ हे गाणं त्यांना ऐकवलं. पुढे मला या गाण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
मी लताजींसोबत बऱ्याच स्टेज शोमध्येही सहभागी झालो. १९९२ मध्ये बंगळूरुमध्ये आमचा एक कार्यक्रम होता. १ डिसेंबर हा माझा वाढदिवस. योगायोगाने त्याच दिवशी हा कार्यक्रम होता. मदनमोहन यांच्या मुलाने, संजीव कोहली यांनी लताजींना माझ्या वाढदिवसाबद्दल सांगितलं. त्या कार्यक्रमाला तीन लाख लोक उपस्थित होते. लताजींनी त्यावेळी मला सोन्याची चेन भेट दिली आणि उदित नारायण ‘पार्श्वगायनाचे राजकुमार’ असल्याचं कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाला जाहीर करायला सांगितलं. हा माझ्या आयुष्यातला सर्वात खास आणि अविस्मरणीय असा क्षण होता. लताजींनी नेहमीच आपल्या सहगायकांचं कौतुक केलं. मी अनेकदा हा अनुभव घेतला आहे. ‘वीर झारा’मधल्या ‘जानम देख लो मिट गई दुरियाँ’ हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी स्वत: मला फोन करून भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली. माझ्यासाठी हे सगळं अनपेक्षित होतं. खुद्द गानसम्राज्ञीने फोन करून आपल्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. त्यावेळी त्या अंधेरीतल्या एका स्टुडिओमध्ये आल्या होत्या. पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये त्यांची गाडी माझ्या घराबाहेर उभी होती. त्या माझ्या घरी बराच वेळ थांबल्या. त्यांनी आमच्यासोबत चहा प्यायला, पोहे खाल्ले. त्यावेळी माझे आई-वडीलही होते. त्यांनाही त्या भेटल्या. खूप गप्पा मारल्या. त्यावेळी आम्हा सगळ्यांना त्यांच्या साधेपणाची प्रचिती आली.
लताजींसोबतचे अनेक किस्से आहेत. अनेक प्रसंग आहेत. अनेक आठवणी आहेत. त्यांच्याबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. मला त्यांच्या नावाने दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कारही मिळाला आहे. लताजींनी अनेकांना भरभरून आशीर्वाद दिले. त्यांनी अनेक कार्यक्रमांमधून माझा उल्लेख केला. उदितचा आवाज अस्सल असून मला मनापासून आवडतो, असं त्यांनी अनेकदा सांगितलं. साक्षात गानसरस्वतीने केलेलं हे कौतुक म्हणजे माझा सर्वोच्च सन्मान आहे. मला यापेक्षा अधिक काहीही नको.
लताजींनी विविध भाषांमध्ये अगणित गाणी म्हटली. त्यांचं प्रत्येक गाणं मनाला भावतं. कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, मदनमोहन, आर.डी. बर्मन अशा महनीय संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली अवीट गोडीची गाणी लताजींनी म्हटली. लताजींसारख्या महनीय आणि मातृतुल्य व्यक्तीचा सहवास लाभला, त्यांच्या छत्रछायेत वावरण्याची संधी मिळाली, हे माझं सुदैव आणि त्यांचा आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहावा, हीच इच्छा.