दोन पोकलेन गाडले जाऊन एका मजुराचा मृत्यू
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळून दोन पोकलेन गाडले जाऊन त्यात एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली.
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या रस्त्याचे चौपदरीकरण करताना डोंगर कटाई केली जाते. या डोंगराच्या कोसळणार्या दरडीमुळे याठिकाणी आजपर्यंत अनेक दुर्दैवी घटना घडल्या. याआधी पावसाळ्यात या परशुराम घाटाचा एक भाग डोंगराखाली असणाऱ्या धामणगाव येथील एका वाडीवर कोसळला होता त्यामध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आठ दिवसापूर्वी या घाटात रुंदीकरणाचे काम सुरू असताना एक भला मोठा दगड कोसळून बौद्धवाडीतील एका घरावर आदळला. सुदैवाने त्यावेळी घरात कोणी नसल्याने मनुष्यहानी झाली नाही. मात्र परशुराम घाटात नित्यनियमाने अशा दरडी कोसळत असल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणारे प्रवासी आणि वाहन चालक यांच्या जीवाला धोका होण्याची स्थिती आता निर्माण झाली आहे. तरी लवकरात लवकर या रस्त्याचे चौपदरीकरण करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.