शिबानी जोशी
गेल्या आठवड्यात आपण भारतीय स्त्री शक्तिची स्थापना कशी झाली?, संघटनेतर्फे मुख्यत्वे कोणती काम सातत्यानं सुरू आहेत? या विषयीची माहिती जाणून घेतली होती. संघटनेला जवळ जवळ ३१ वर्षे होत आहेत आणि असंख्य महिला, मुली कामाच्या माध्यमातून तसेच कामाच्या तळमळीतून जोडल्या जात आहेत.
भारतीय स्त्री शक्तिला पंचवीस वर्षे झाली तेव्हा महिलांवरचे २५ विषय घेऊन त्यावर अभ्यास पुस्तिका काढल्या गेल्या. त्यात पाणी, पोलीस कॉन्स्टेबलचे कुटुंब, अशा विषयावरही अभ्यास पूर्ण पुस्तिका काढल्या गेल्या. जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण आलं त्यावेळी महिलांनी पूर्ण सक्षमपणे राजकारणात उतरलं पाहिजे, नुसतं शोभेची बाहुली म्हणून नाही यासाठी ‘मी नगरसेविका’ नावाच्या विविध प्रशिक्षण कार्यशाळा संघटनेनं घेतल्या. त्यासाठी पुस्तिकाही तयार केली गेली. हे कार्यक्रम महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा येथे झाले. यात संघटनेच्या लातूर शाखेने राजकारणात असलेल्या महिलांच्या मुलाखतीची एक पुस्तिकाही तयार केली.
संघटनेच्या कामाचं एक वैशिष्ट्य म्हणजे कुटुंब सल्ला केंद्र. संघटनेतर्फे महाराष्ट्रात ११ काउन्सिलिंग सेंटर चालतात, त्यातील सहा केंद्रांना सरकारी अनुदानही आहे. यात महिलांना त्यांच्या प्रश्नावर वैयक्तिक सल्ला दिला जातो. त्यांना वैद्यकीय, न्यायालयीन कोणताही सल्ला तसेच मदत या केंद्रामार्फत दिली जाते. नागपूरला उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे, विदर्भातल्या विविध गावांतून महिलांना त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी या न्यायालयात यावे लागते, यांच्याबरोबर त्यांची मुलं असतात अशा वेळी या महिलांच्या मुलांना निवारा मिळावा यासाठी नागपूर न्यायालयाच्या जवळ मुलांसाठी पाळणाघर सुरू केलं गेलं. आधी अगदी छोटीशी शेड होती. आता भारतीय स्त्री शक्तीची एक स्वतः ची इमारत उभी आहे. आज हे पाळणाघर तिथल्या महिलांचा एक आशेच ठिकाण झाले आहे.
महिलांशी संबंधित बऱ्याच प्रश्नांवर अभ्यास किंवा संशोधनही संघटनेतर्फे केले जाते. निर्भया दुर्घटना जेव्हा घडली होती त्यानंतर सरकारने अनेक कडक कायदे केले. बलात्कारीत महिलांसाठी विशेष निधीची सोय केली, पण या सर्व गोष्टी महिलांपर्यंत पोहोचतात का? यावरचा अभ्यास ४ राज्यांत संघटनेने केला होता आणि त्यासंबंधीच्या शिफारशीही सरकारकडे पाठवल्या. वर्मा समितीला महिला सुरक्षा संदर्भात अनेक शिफारशी अभ्यास करून स्त्रीशक्तीने केल्या. पुण्याला पंधरा दिवस महिला सुरक्षा पंधरवडा राबविण्यात आला होता. यात पुरुषांचाही सहभाग घेण्यात आला होता. कारण, महिलांची सुरक्षा ही फक्त महिलांच्या हातात नसून पुरुषांचीही महत्वाची भूमिका असते. पुरुषांनाही सजग करणे गरजेचे आहे. सध्या संघटनेतर्फे एक सर्व्हे सुरू आहे. सरकारच्या महिलाविषयक चांगल्या योजना आहेत, उदाहरणार्थ उज्ज्वला गॅस योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, खरंच या किती महिलांपर्यंत पोहोचतात, कोणत्या महिला यापासून वंचित आहेत? याचा अभ्यास सध्या सुरू आहे. हे काम राष्ट्रीय महिला आयोगासाठी सुरू आहे. थोडक्यात स्त्री प्रश्नांचा अभ्यास करणं, संशोधन करणं, त्यावर आधारित शिफारशी सरकारला करणे, पुस्तिकांच्या माध्यमातून जागृती करणे, महिलांचे आर्थिक सबलीकरण असे विविध कार्यक्रम स्त्रीशक्तीकडून सुरू आहेत, त्यावर अभ्यास सुरू आहे. केरळला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महिलांच्या स्वच्छतागृहाबाबत एक सर्व्हे केला. सार्वजनिक स्वच्छतागृहाची अवस्था, तिथली सुरक्षा यावर सर्व्हे करून एक शिफारस तिथल्या सरकारला करण्यात आली आणि त्या शिफारशीनुसार सरकारनेसुद्धा या सर्व स्वच्छतागृहांची व्यवस्थित देखभाल सुरू केली. केरळमधील संघटनेच्या के. जयश्री या कार्यकर्तीला या कामामुळे तिथे ‘टॉयलेट वुमन’ म्हणून ओळखलं जातं. सध्याचा एक चर्चिला जात असलेला प्रश्न म्हणजे मुलींचे लग्नाचे वय १८ असावे की २१? यावरही सर्व्हे केला जात आहे. मुलींनी स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी तसेच लहान वयात लग्न आणि लहान वयात गर्भारपण आलं की, अनेक वेळा मृत्यूचे प्रमाण वाढते, त्यामुळे वय २१ असावे, असा संघटनेचा आग्रह आहे. केंद्र सरकारने जेव्हा २१ वर्षे वयाचा हा प्रस्ताव आणला तेव्हा संघटनेने प्रांतांमध्ये सर्व्हे केला आणि लोकांची मतं जाणून घेतली.
संस्थेचे सध्या कोरोना काळात ऑनलाइन उपक्रम सुरू आहेत. या काळात नागपूरला सेक्स वर्कर्स, तृतीयपंथीय यांच्या गल्लीत जाऊन त्यांना मदत केली आहे. चिपळूणलासुद्धा पूर आला होता तेव्हा बाराशे गरजू महिलांना रोजच्या वापरातल्या वस्तूचे किट्स वाटण्यात आले होते.
भारतीय स्त्री शक्तीच्या सध्या राष्ट्रीय अध्यक्ष गुजरातच्या शैलजाताई अंधारे, तर नयना सहस्त्रबुद्धे उपाध्यक्ष आहेत. वर्षा पवार तावडे या राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय कार्यालय सचिव रागिणी चंद्रात्रे, निर्मलाताई आपटे या भारतीय स्त्रीशक्तीच्या संस्थापक आहेत आणि आजही त्या संघटनेला मार्गदर्शन करत असतात. मुंबईमध्ये माहीम, सांताक्रुज आणि बोरिवली येथे संघटनेचे काम चालतं. येणाऱ्या काळात जास्तीतजास्त तरुण मुला-मुलींना आपल्या उपक्रमात सहभागी करून घेण्याची योजना आहे. त्यासाठी युथ विंग तयार करण्यात आली आहे. त्याशिवाय ग्रामीण भागात स्त्रीशक्तीला आपलं जाळं अजून पसरवायचं आहे. ग्रामीण भागात हेल्प डेस्क स्थापन करून महिलांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती देऊन त्या योजनांचा उपयोग कसा करून घ्यायचा याबाबतची माहिती हेल्प डेस्कच्या माध्यमातून द्यायची आहे. सरकारी अनेक चांगल्या योजना असतात, पण त्याची माहिती सर्वसामान्य महिलांना नसते. ती माहिती या बसच्या माध्यमातून दिली जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त २६ जानेवारी ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये ज्या महिलांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलं, त्यांचं कार्य विविध ठिकाणी जाऊन समोर आणायचं उद्दिष्ट समोर आहे.
मुंबईत स्थापन झालेल्या भारतीय स्त्री शक्तीचे गेल्या तेहतीस वर्षांत देशभर जाळे पसरले आहे. आणि सर्व गटातल्या, स्तरातल्या, वयोगटातल्या महिलांच्या प्रश्नांवर संघटनेचे काम सुरू आहे.