मुंबई : काल अमिताभ बच्चन, शाहरुख, आमिर, रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, मधुर भांडारकर, आशुतोष गोवारिकर अशा हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकेच बॉलीवूडकर लता मंगेशकर यांना अखरेचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहिलेले दिसून आले. पण कुठे गेल्या त्या अभिनेत्री ज्यांना लता मंगेशकर यांचा आवाज मिळण्याचं भाग्य लाभल. कुठे होती माधुरी दिक्षित, काजोल, जुही… या एकाही अभिनेत्रीला या स्वरसम्राज्ञीचं अखेरचं दर्शन घ्यावं असं का वाटलं नाही? का त्या अंत्यदर्शनासाठी तिकडे फिरकल्या नाहीत? की फक्त सोशल मीडियावर भावना व्यक्त झाल्या की काम फत्ते. काल लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप दिल्यानंतर या चर्चेला मात्र सुरुवात झाली आहे.
लता मंगेशकरांचा आवाज आपल्याला मिळणार, त्यांनी गायलेल्या गाण्यावर आपल्याला ताल धरता येणार म्हणजे बॉलीवूडच्या अभिनेत्रींसाठी ते परमभाग्य असायचं. आजपर्यंत लता दिदींनी मधुबाला, वैजयंतीमाला, नंदा, साधना, वहिदा रहमान पासून ते श्रीदेवी, माधुरी दिक्षित, जुही चावला, मनिषा कोईराला, ऐश्वर्या राय-बच्चन, काजोल अशा अनेक अभिनेत्रींना आवाज दिला आहे. लता दिदींनी गाणं गायलं की ते पडद्यावर हिटच होणार हे ठरलेलं. कित्त्येकदा तर कैक अभिनेत्रींचा प्रवास गाणं हीट झाल्यामुळे सुखकरही झाला होता. दीदी वर्षाला एखादं तरी गाणं असं द्यायच्या की त्यावर परफॉर्म करणाऱ्या अभिनेत्रींचं नशीब पलटणार हे ठरलेलंच. पण अशा लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देताना या सर्व बड्या अभिनेत्री राहिल्या कुठे? असा प्रश्न आता चर्चेत आला आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे कोरोना आणि न्युमोनियामुळे मुंबईत ब्रीचकॅंडी इस्पितळात ६ फेब्रुवारी,२०२२ रोजी निधन झाले. त्यानंतर केवळ भारतातूनच नाही तर जगभरातून त्यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला जात आहे. काल सिनेइंडस्ट्रीतली अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच जण उपस्थित होते. तसं पाहिलं तर लता दीदींनी बॉलीवूडसाठी खूप काम केलेलं आहे. त्यांच्या गाण्यांनीच अनेकदा बॉलीवूड सिनेमांना तारलं आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये.