
सातारा : सातारा औद्योगिक वसाहतीतील पंडित ऑटोमोटिव्हच्या जागेच्या कारणावरुन खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे या दोन्ही राजांमध्ये टीकायुध्द सुरु आहे. एकमेकांवर हल्लाबोल करण्याची संधी हे दोन्ही नेते कधीही सोडत नाहीत. शिवेंद्रराजेंनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा उदयनराजेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, मला चिरडायचे असेल तर हत्तीची गरज नाही, उदयनराजेंनी माझ्या अंगावर उडी मारली तरी मी चिरडून जाईन, असा टोला त्यांनी लगावला.
आमदार शिवेंद्रराजे यांनी पंडित ऑटोमोटिव्ह कंपनी बेकायदेशीर रित्या खरेदी केल्याचा आरोप करत कामगारांवर अन्याय करणा-या लोकांना राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली देऊन चिरडलं असतं, असं विधान उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंचं नाव न घेता केलं होतं. त्याला शिवेंद्रराजेंनी प्रत्युत्तर दिले.
सातारा एमआयडीसी वाढत नसल्याचे एकमेव कारण खासदार उदयनराजे असून उद्योजकांना धमकावणे, दमदाटी करणे, वसुल्या करायच्या आदी कामे ते आणि त्यांचे बगलबच्चे करतात. या व इतर अनेक कारणांमुळे सातारा एमआयडीसीऐवजी उद्योजकांनी इतर ठिकाणांना पसंदी दिल्याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. कारखानदारांकडून हप्ते घेणं, त्यांना दमटाटी करणं यामुळे सुद्धा साता-यातील एमआयडीसीमध्ये कंपन्या आल्या नाहीत आणि असलेल्या कंपन्या निघून गेल्या आहेत. मी ही कंपनीची जागा खरेदी करताना संपूर्ण कायदेशीरपणे खरेदी केली आहे, त्यामुळे उदयनराजेंचे हे आरोप बिनबुडाचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.