न्यूयॉर्क : युक्रेनवरून रशिया आणि नाटो देशांमध्ये तणावाचं वातावऱण आहे. दोन्ही देशांकडून लष्करी पातळीवर हालचाली वाढल्या आहेत. यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. रशिया युक्रेनवर कोणत्याही दिवशी हल्ला करू शकतो. तसंच हा संघर्ष पेटला तर याची मोठी किंमत मानवतेला मोजावी लागेल असा इशाराही जॅक यांनी दिला आहे. राष्ट्राध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार असलेल्या जॅक यांनी दुसऱ्यांदा असा इशारा दिला आहे. याआधी अमेरिकन अधिकाऱ्यांनी रशियाने जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यातच किमान ७० टक्के लष्कर आणि शस्त्रसाठा एकत्र केला होता.
जॅक सुलिवन यांनी सांगितलं की, जर युद्ध झालं तर युक्रेनला मोठी किंमत मोजावी लागेल. मात्र आमची तयारी आणि प्रतिक्रिया यांवर आमचा विश्वास आहे की रशियालासुद्धा यासाठी किंमत मोजावी लागेल. रशिया हल्ला करून लगेच युक्रेनवर ताबा मिळवू शकतो आणि यात ५० हजार जणांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
सुलिवन यांनी असंही सांगितलं की, अजुनही यावर चर्चेतून तोडगा शक्य आहे. प्रशासनाकडून रशियाचा युक्रेनवर हल्ला करण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. दुसरीकडे रशियाने मात्र कोणत्याही प्रकारे युक्रेनवर हल्ला करण्याचा किंवा ताबा मिळवण्याचा प्रयत्न नसल्याचं म्हटलं आहे. सीमेवर एक लाख सैनिक हे रशियाच्या सुरक्षेच्या काळजीपोटी तैनात करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
युक्रेनला नाटोचा सदस्य व्हायचं आहे. मात्र याला रशियाकडून विरोध केला जात आहे. नाटो ही जगातील २९ देशांची एकत्रित अशी लष्करी संघटना आहे. आपला शेजारी देश युक्रेन नाटो देशांचा मित्र होऊ नये अशी भावना रशियाची आहे. यामुळे नवे युद्ध छेडले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यात अनेक देश भाग घेऊ शकतात.