असामान्य, महान, अद्भुत, अद्वितीय… अशी कुठलीही विशेषणे तोकडी पडावीत; किंबहुना त्यांचे वर्णन शब्दबद्ध करणेच अशक्य आहे, अशा भारतरत्न लता मंगेशकर यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांना २८ दिवसांपूर्वी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती त्यांना कोरोना व न्युमोनियाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांनी असाध्य अशा कोरोनावर मातही केली होती. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून देशातील अबालवृद्धांपासून साऱ्यांनाच त्यांच्या प्रकृतीची काळजी वाटत होती. त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे म्हणून कित्येकांनी देव पाण्यात घालून ठेवले होते, पूजा-अर्चा, होम-हवन आदी सर्वत्र सुरू होते. त्यातच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागल्यामुळे त्यांची कृत्रिम श्वसनयंत्रणाही अलीकडेच काढण्यात आली होती, तेव्हा सर्वांनाच हायसे वाटले. मात्र काल शनिवारपासून पुन्हा त्यांची प्रकृती खालावत गेली आणि सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
गेल्या सात-आठ दशकांहून अधिक काळ जगभरातील संगीतप्रेमींचे, सामान्यांचे भावविश्व समृद्ध करणारा हा दैवी स्वर अखेर शांत झाला. देशात घराघरांत लोकांना ठाऊक असलेल्या भारतीय व्यक्ती कोण?, असा प्रश्न जर कुणी विचारला, तर मोजकी नावे पुढे येतील व त्यात भारतरत्न लता मंगेशकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आपण सर्व त्यांना लतादीदी या नावाने ओळखतो. आपल्या सुरेल गळ्यातून अक्षरश: हजारो हिंदी-मराठी आणि अन्य भाषांमध्ये गाणी गाऊन त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. गेल्या सात दशकांहून अधिक काळ, म्हणजे रसिकांच्या तीन ते चार पिढ्या या त्यांची सुमधुर गाणी ऐकत मोठ्या झाल्या. दीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदोर येथे झाला. त्यांचे वडील पंडित दिनानाथ मंगेशकर हे त्या काळातील मराठी संगीत नाट्यसृष्टीतले प्रसिद्ध गायक-नट होते. दीदींना पहिले गुरू लाभले ते खुद्द त्यांचे वडील पंडित दिनानाथ. त्यामुळे केवळ वयाच्या पाचव्या वर्षापासून दीदींनी वडिलांच्या संगीत नाटकांत बालकलाकार म्हणून कामे करण्यास सुरुवात केली. दीदी अवघ्या तेरा वर्षांच्या असताना, म्हणजे १९४२ साली पंडित दिनानाथांचे हृदयविकाराने निधन झाले. दीदींना हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळवणे आणि आपली जागा निर्माण करणे तेवढे सोपे नव्हते. त्या काळात हिंदी संगीत क्षेत्रात नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई अंबालेवाली यांच्यासारख्या नामवंत गायिकांच्या अनुनासिक आणि जड आवाजाची मोहिनी भारतीयांवर पडली होती. त्यामुळे त्या काळातील प्रथितयश निर्मात्यांना दीदींचा आवाज अतिशय नाजुक, ‘बारीक’ वाटला. प्रारंभी काहींनी तो नाकारलाही.
प्रारंभी दीदी नूरजहाँसारख्या गायिकांच्या आवाजाचे अनुकरण करीत. कालांतराने त्यांनी स्वत:ची शैली निर्माण केली. दीदींनी आपले उर्दू उच्चार सुधारावेत म्हणून अपार कष्ट घेतले. दीदींचे १९४९ सालच्या ‘महल’ या चित्रपटातले खेमचंद प्रकाश या संगीतकाराने स्वरबद्ध केलेले ‘आयेगा… आयेगा आनेवाला’ हे लोकप्रिय झालेले पहिले गाणे. या गीतानंतर दीदींनी पुन्हा मागे वळून कधी पाहिले नाही. त्या काळातील अनिल विश्वास, नौशाद, सज्जाद हुसेन, वसंत देसाई, हंसराज बहल, वसंत देसाई यांच्यासारखे जुने आणि उदयाला येणारे एस. डी. बर्मन, सलील चौधरी, सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन, मदन मोहन, उषा खन्ना, रवी, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि आर. डी. बर्मन अशा सगळ्याच संगीतकारांकडे दीदी गाऊ लागल्या. ओ. पी. नय्यर वगळता त्या काळातील जवळजवळ प्रत्येक संगीतकाराकडे दीदी गात होत्या. संगीतकार सलील चौधरी यांनी ‘मधुमती’ या चित्रपटासाठी स्वरबद्ध केलेल्या ‘आजा रे परदेसी’ या गाण्यासाठी त्यांना प्रथम फिल्मफेअर मिळाला. त्यानंतर सतत दहा वर्षे त्यांना हे पारितोषिक मिळत राहिले. नंतर मात्र दुसऱ्यांना संधी मिळावी म्हणून त्यांनी स्वत:हून हे पारितोषिक घेण्याचे थांबविले. १९६२ साली चीनबरोबरच्या युद्धात भारताचे शेकडो जवान धारातीर्थी पडले. या युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २७ जून १९६३ साली दिल्लीत एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी कवी प्रदीप यांनी गीत लिहिले आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केले होते. लतादीदींनी गायलेले ते गीत म्हणजे ‘ऐ मेरे वतन के लोगो’. हे गीत ऐकून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांचे अभंग, छत्रपती शिवरायांची शौर्यगीते त्यांनी अजरामर केली.
‘आनंदघन’ या नावाने त्यांनी काही चित्रपटांना संगीतही दिले. त्यांनी काही मराठी (वादळ) आणि हिंदी (झांजर, कांचन, लेकीन) चित्रपटांची निर्मितीही केली. दीदींना अत्तर, हिऱ्यांची चांगली पारख, आवड होती. त्यांना छायाचित्रे काढण्याचा छंद होता तसेच क्रिकेट मॅच बघणे त्यांना खूप आवडायचे. दीदींना असंख्य पुरस्कार मिळाले. १९६९ साली पद्मभूषण आणि १९९९ साली पद्मविभूषण ही पारितोषिके प्रदान करण्यात आली. ‘दादासाहेब फाळके’ हा चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान १९८९ मध्ये त्यांना प्रदान करण्यात आला. सर्वोच्च समजला जाणारा ‘भारतरत्न’ हा किताब त्यांना २००१ साली प्रदान करण्यात आला. जात-पात, धर्म, भाषा, प्रांत, देश अशी सर्व बंधने लीलया तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात भरभरून अखंड आनंद पेरणाऱ्या या स्वरलतेने अखेरची भैरवी घेतली आणि सारे जग हेलावून गेले. लतादीदींच्या जाण्यामुळे संगीत, सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे. सुरेल संगीतामुळे तृप्त होणारे प्रत्येक मन आज खंतावले आहे, दु:खसागरात बुडाले आहे. कुणी कुणाशी काय बोलावे, हेच कळेनासे झाले आहे. सारे जग जणू नि:शब्द झाले आहे. आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर म्हणजे तो आनंदाचा क्षण असो की दु:खाचा… विरहाचा की मिलनाचा… तसेच सीमेवर शत्रूशी दोन हात करण्याचा… लतादीदींच्या सुराने प्रत्येकाला त्या-त्या वेळी हात दिलाय, साथ दिलीय हे नक्की. लतादीदी लौकिकार्थाने आपल्यातून निघून जरी गेल्या असल्या, तरी अनादी काळापर्यंत सुरांच्या रूपाने त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील, आनंदाची पखरण करत राहतील.