भोपाळ : भारतरत्न लता मंगेशकर यांचा मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या नावाने संगीत अकादमी देखील स्थापन केली जाणार आहे. याबाबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज घोषणा केली.
लता दीदींचा जन्म इंदूरमध्ये झाला होता. त्यामुळे त्यांच्या नावाने इंदूरमध्ये संगीत अकादमी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संगीत महाविद्यालयात विद्यार्थ्यांना त्यांच्या गाण्याचं शिक्षण दिलं जाईल. एक संग्रहालय तयार करून आम्ही त्यात लता दीदींच्या सर्व गाण्याचं संग्रह करणार आहोत, असं शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं.
लता दीदी या फक्त संगीतापुरत्या मर्यादीत नव्हत्या. त्या एक सच्च्या देशभक्त होत्या. त्यांच्याकडून सर्वांना प्रेरणा मिळतेय. भावी पिढीला देखील ही प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे, असंही सिंह म्हणाले. आज त्यांनी स्मार्ट सिटी पार्क येथे लता दीदींच्या स्मरणार्थ एक झाड लावले. यावेळी भोपाळमधील संगीत क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.
लतादीदींच्या निधनाने वैयक्तिक नुकसान झाल्याची भावना करोडो भारतीयांची आहे. त्यांच्या गाण्यांनी आपल्या सर्वांच्या जीवनात नवा उत्साह आणि ऊर्जा संचारली आहे. लता दीदींच्या जाण्यामुळे माझ्या स्वतःच्या आयुष्यात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केल्या.