मालेगाव (जि. नाशिक) : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने त्रिस्तरीय समिती नियुक्त केली आहे. येत्या दोन दिवसांत समितीचा अहवाल येणे अपेक्षित आहे. त्यानंतरच एसटीच्या विलीनीकरणाबाबत पुढचे पाऊल उचलणे शक्य होईल, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी केले.
मालेगाव येथे उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात परिवहन मंत्री परब यांनी संवाद साधला. परब म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना संप मिटविण्याबाबत वारंवार आवाहन करण्यात येत आहे; परंतु ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्याने निर्णय होऊ शकलेला नाही. त्रिस्तरीय समितीचा अहवाल आल्यानंतर तो न्यायालयाला सादर केला जाईल. एसटी बंद ठेवून कर्मचाऱ्यांच्या मागण्या, हक्क मिळू शकत नाहीत. एसटीचा संप नाहक लांबविण्यात आला आहे. त्यांना फितविणाऱ्यांमुळे एसटीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्रिस्तरीय समिती जो निर्णय देईल, तो आम्ही मान्य करू. ज्यांना तो निर्णय मान्य नसेल, त्यांनी अपिलात जावे, असेही परब यांनी सांगितले.