नवी दिल्ली : पुणे विद्यापीठाच्या शांतिश्री पंडित यांची जेएनयूच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जेएनएयू विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला कुलगुरु मिळाली आहे.
जेएनयु विद्यापीठाचे कुलगुरु जगदेश कुमार यांची नियुक्ती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्ष पदी झाली आहे. त्याआधी जानेवारीच्या अखेरीस त्यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यांच्यानंतर आता या पदावर पुणे विद्यापीठाच्या डॉक्टर शांतिश्री पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शांतिश्री पंडित या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक आहेत. राज्यशास्त्रासोबतच प्रशासनाचा चांगला अनुभव आहे जेएनयू विद्यापीठातून त्यांनी एमफील आणि पीएचडी केली आहे. त्यांनी गोवा विद्यापीठात १९८८ ला अध्यापनाला सुरुवात केली. त्यानतंर १९९३ मध्ये त्या पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. युजीसीच्या अनेक समित्यांवर सदस्य म्हणूनही त्या सध्या काम पाहतात.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून त्यांच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. शांतिश्री पंडित यांची ५ वर्षांच्या कालावधीसाठी कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय संबंध या विषयावर शांतिश्री पंडित यांनी एमफील आणि पीएचडी केली आहे. त्या इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सदस्य आहेत. त्यांनी आतापर्यंत पीएचडीसाठी २९ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.