नवी दिल्ली (हिं. स.) : कोरोना महामारीच्या संकटकाळात लॉकडाऊनमध्ये काँग्रेसच्या लोकांनी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर उभे राहून मुंबईतील कामगारांना आपापल्या घरी जाण्यासाठी तिकीट काढून दिले. लोकांना मुंबई सोडून जाण्यासाठी प्रोत्साहित केले. काँग्रेसनेच देशातील नागरिकांना कोरोना फैलावण्यासाठी चिथावले.
मुंबईत काँग्रेस नेते यूपी आणि बिहारच्या लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यास सांगत होते. त्यासाठी त्यांना पैसेही देत होते. तुमच्या राज्यात जा आणि कोरोना फैलवा असे सांगत होते, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. कोरोना संकटाच्या काळात पहिल्या लाटेवेळी कामगारांच्या स्थलांतरावरून महाराष्ट्र, दिल्ली सरकार आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर काँग्रेस सदस्यांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला सोमवारी सडेतोड उत्तर दिले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत देश जेव्हा लॉकडाऊनचे पालन करत होते, जागतिक आरोग्य संघटनेला सल्ला देत होता, तज्ज्ञ म्हणत होते की, जो तिथे आहे तिथेच त्याने थांबावे. कारण माणूस एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असेल आणि तो कोरोना संक्रमित असेल तर त्याच्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो.
त्यावेळी काँग्रेसने नेमकी चूक केली. त्यांनी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर उभे राहून लोकांना मुंबई सोडून जाण्यासाठी प्रोत्साहित केले. कामगार, मजुरांना तििकटे देण्यात आली. लोकांना प्रेरित करण्यात आले. महाराष्ट्रात आमच्यावर जो बोजा आहे तो जरा कमी व्हावा, तुम्ही जा…, तुम्ही उत्तर प्रदेशचे आहात… तुम्ही बिहारचे आहात…. तिथे जा…, कोरोना पसरवा. तुम्ही हे मोठे पाप केले आहे. अफरातफरीचे वातावरण निर्माण केले आणि कामगार बांधवांना अनेक कठीण प्रसंगात ढकलून दिले’, अशी घणाघाती टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये कोरोना नव्हता तिथे कोरोना अधिक पसरला गेला. मानव जातीवर संकट आले असताना हे कसे वागणे आहे. काँग्रेसच्या या वागण्याने मीच नाही पूर्ण देश अचंबित आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विचार व्यक्त करणाऱ्या सर्व पक्षांच्या सदस्यांचे आभार मानले. मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करून केली. ‘देशाने आदरणीय लतादीदींना गमावले आहे.
एवढा मोठा काळ ज्यांच्या आवाजाने देशाला मोहित केले, देशाला प्रेरित केले, देशाला भावनांनी भरले. मी आज आदरणीय लतादीदींना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो’, असे मोदी म्हणाले.
‘आप’वरही गंभीर आरोप
दिल्लीतील सरकारने तर गाड्यांवर माईक, स्पीकर लावून झोपडीत राहणाऱ्या कामगार, मजुरांना त्यांच्या गावी जाण्यास सांगितले. त्यांच्यासाठी बसेस दिल्या. पण त्यांना अर्ध्या रस्त्यात सोडून त्यांच्यासमोर अडचण निर्माण केली. त्याचे कारण असे झाले की, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबमध्ये कोरोनाचा जास्त प्रसार नव्हता. पण तिथे कोरोना संकट वाढवण्याचे पाप काँग्रेसने केले, असा गंभीर आरोप मोदी यांनी केला.
गरिबांना घरे मिळाली…
‘गेल्या काही वर्षांत अनेक क्षेत्रांत आपण मजबुतीने पुढे आलो. पीएम आवास योजना, गरिबांना राहण्यासाठी घरे, हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. पण आपण त्याला गती दिली. त्यामुळे गरिबांचे घर सुद्धा लाखोंपेक्षा अधिक किमतीचे होत आहे. ज्या गरिबाला पक्के घर मिळते तोही लखपतीच्या श्रेणीत येतो. गरिबांच्या घरात शौचालये आली आहेत. त्यामुळे उघड्यावर शौच करणे बंद झाले आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर गरिबांच्या घरात उजेड आला, तर त्याचा आनंद हा देशाचा आनंद वाढवतो. गरिबाच्या घरात गॅस कनेक्शन असेल, असेही मोदी यावेळी म्हणाले.
जगाचे नेतृत्व करण्याची संधी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘दुसऱ्या महायुद्धानंतर जगात मोठा बदल झाला. मी स्पष्टपणे पाहतोय की, कोरोना संकटानंतर जग एका नव्या व्यवस्थेकडे पुढे जात आहे. एक असा टर्निंग पॉइंट आहे. आपण भारताच्या रूपाने ही संधी गमावता नये. भारताने एका लिडरशिप रोलमध्ये स्वत:ला कमी लेखू नये. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही एक संधी आहे. देश जेव्हा स्वातंत्र्याची शंभरी साजरी करेल तेव्हा आपण सामर्थ्यवान होऊ हा संकल्प केला पाहिजे’, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शेरो शायरीतून काँग्रेसवर हल्ला…
इन्हे आईना मत दिखाओ, वो आईना भी तोड देंगे… असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला. ‘नागालँडमधील लोकांनी १९९८ ला काँग्रेसला मत दिले होते. ओरिसात १९९५ ला शेवटचे बहुमत दिले होते. त्रिपुरात १९८८ मध्ये काँग्रेसला बहुमत दिले होते. पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्षे बहुमत मिळाले नाही, आंध्र प्रदेशमध्ये १९६२ नंतर सत्ता मिळाली नाही. काँग्रेस तेलंगणा राज्य निर्मितीचे श्रेय घेते, पण त्यानंतर तेथील लोकांनी त्यांना स्वीकारले नाही. झारखंडची निर्मिती होऊन २० वर्षे झाली अजून बहुमत मिळाले नाही,’ असे म्हणत मोदींनी काँग्रेसला डिवचले.