हिसका

कथा : डॉ. विजया वाड


व्याख्यानाला जाणं हे एक व्यसन असतं. ‘गर्दी चढणं’ हे त्याहून भारी व्यसन! पण अशी व्यसनं मला आवडतात आणि खूप खूप वेळा भारीसुद्धा पडतात. परगावच्या व्याख्यानांना श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळतो म्हणून वारंवार तो मोह टाळता येणं कठीण जातं.


पण परगावचे हिसकेही तसेच जबर असतात. महाराष्ट्रभर व्याख्यान देण्यासाठी दौरे केलेल्या प्रत्येक लेखकाला कुठे ना कुठे हा हिसका बसतोच बसतो.


मी एका आडगावात व्याख्यानाला गेले होते. माझा विषय होता, ‘श्यामची आई आणि आजची आई.’ या अगोदर उत्कर्ष मंदिरात झालेले माझे याच विषयावरले व्याख्यान चांगले झाले होते आणि वृत्तपत्रात, रेडिओ, टीव्हीवर त्याविषयी चांगले लिहिले, बोलले गेले होते. म्हणून त्याच विषयावर बोलायचा आग्रह मला जागोजागी होत होता.


मी रेल्वेने स्थानकात उतरले, तेव्हा शाळकरी मुले आणि पीटीचे गुरुजी हातात हार घेऊन माझ्या स्वागताला सज्ज होते. काय स्वागतशील माणसे आहेत म्हणून मला खूप बरे वाटले. आम्ही इच्छितस्थळी पोहोचलो. पोहोचताच बँडच्या पथकाने माझे जोरदार स्वागत केले. तांब्याचा लखलखीत लोटा नि भांडे मला देण्यात आले. मी गुपचुप पाणी प्यायले.


“चला, मुले आतुरतेने आपली वाट बघत आहेत.” हेडगुरुजी म्हणाले.


“आपल्याला एक गाडी उशीर झाल्याने फार ताटकळली आहेत बिचारी.” त्यांनी पुस्ती जोडली... मी ओशाळं हसले आणि व्याख्यानाच्या ठिकाणी गेले.


टाळ्यांच्या गजरात स्वागत आणि नंतर रंगलेले कथारूप व्याख्यान. मुलं, संयोजक, मी... सगळेच खूश!


“फर्स्टक्लास!” हेडगुरुजींनी प्रशस्तिपत्र दिले.


मग मला एका बाजूला घेऊन ते म्हणाले, “जरा बोलायचं होतं.”


“हं. बोला.”


“आपली मानधनाची रक्कम आज देता येत नाही याबद्दल मी अत्यंत दिलगीर आहे.”


“निदान चहा तरी मिळेल ना? माझा घसा बोलून बोलून सुकला आहे.” मी जरा रागानेच म्हटले.


“वा! हे काय विचारणं झालं?”


“चला मग.”


आम्ही चहा घेतला. टांगा बोलावण्यात आला. माझ्या पोटात भुकेनं कावळे ओरडत होते. पण ‘मला खायला द्या’, असं सांगणं मला प्रशस्त वाटेना.


टांग्यात बसले. माझ्याबरोबर एक बारकं पोरगं देण्यात आलं. बस्. रेल्वे स्थानक येताच त्यानं टांग्यातून टुणकन् उडी मारली आणि ‘नमस्ते’ असं ओरडून ते पोरगं कुल्याला पाय लावून पळून गेलं.


अच्छा!


म्हणजे शाळेनं टांग्याचं भाडंसुद्धा वाचवलं तर!


मी मुकाट्यानं चोवीस रुपये काढून दिले आणि स्थानकावर येऊन एक मोठं चॉकलेट एनर्जी राहावी म्हणून खायला घेतलं.


घरी परतल्यावर माझ्या एका लेखक मित्राला माझा किस्सा मी सांगितला तेव्हा तो म्हणाला, “हे तर काहीच नाही!”


“म्हणजे?”


“माझं व्याख्यान ठेवलेल्या ठिकाणी मी गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की, आज एक लोकप्रिय तमाशा कलावंत गावात आली असल्याने आपले व्याख्यान रद्द केले आहे. कारण संयोजकांनाही तमाशात जास्त रस आहे. पुढे नक्की आपलंच व्याख्यान पुन्हा कधी तरी ठेवू.”


“आणि?”


“आणि काय? घुमजाव!”


“तुम्ही रागावला नाहीत?”


“फायदा होता का? माझं बीपी फुकट वाढलं असतं! सो? संयम एक युद्ध! स्वत:विरुद्ध!” किती खरं होतं माझ्या मित्राचं म्हणणं!

Comments
Add Comment

ऋषी लोमश

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे प्रदीर्घ दीर्घायुष्य लाभलेले महर्षी म्हणून पुराणात यांचा उल्लेख आहे.

विमा : हमी की फसवणूक?

संवाद : निशा वर्तक  “इन्शुरन्स काढा…, भविष्य सुरक्षित ठेवा…” हे वाक्य आपण किती सहज ऐकतो! आजारपण, अपघात,

नाना देही, नाना रूपी तुझा देव आहे...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे खूप पूर्वी भारतीय कुटुंबसंस्था अतिशय मजबूत होती. ती जवळजवळ अभेद्यच आहे असे

मित्र नको, बाबाच बना!

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू असे कोणते बाबा असतात का ज्यांना मुलांवर प्रेम करायला आवडत नाही. मुलांनी आपल्याला

महापालिकांत चुरस

विशेष : डॉ. अशोक चौसाळकर  महापालिका निवडणुकीमध्ये राज्यभरात जोरदार लढत रंगणार आहे. या निवडणुकीमध्ये भाजप आणि

‌ध्रुव ६४ : भारताचे धुरंधर यश

तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूर भारताने स्वतःचे स्वदेशी मायक्रोप्रोसेसर विकसित करण्याच्या प्रवासातील एक