Tuesday, September 16, 2025

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन

मुंबई : जगप्रसिद्ध पार्श्वगायिका, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज ६ फेब्रुवारी रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. गेल्या २८ दिवसांपासून त्या ब्रीच कँडी इस्पितळात उपचार घेत होत्या. कोरोना आणि न्युमोनियाची लागण झाल्याने त्यांना तातडीने इस्पितळात हलवण्यात आले होते. यानंतर त्यांची प्रकृती सुधारल्यामुळे त्यांची कृत्रिम श्वसनयंत्रणा काढण्यात आली होती. मात्र, आज सकाळी त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांना पुन्हा कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले. अखेर आज सकाळी ८ वाजून  १२ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता नाव ठेवल्याचे म्हटले जाते.

लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये झाली होती आणि त्यांची कारकीर्द आठ दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी मराठी, हिंदी चित्रपटांची गाणी तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे.

लता दीदींना २००१ साली संगीत क्षेत्रातील देदीप्यमान कामगिरीबद्दल 'भारतरत्न' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लता दीदींना पद्मविभूषण, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार यांसह असंख्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. १९९२ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने लता मंगेशकर यांच्या नावाने लता मंगेशकर पुरस्कार नावानेही पुरस्काराचीही सुरुवात केली. तर मध्य प्रदेश सरकारनेही १९८४ सालापासून लता मंगेशकर पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली. जी अविरत सुरू आहे.

लता दीदींच्या आयुष्याचा प्रवास जरी आज थांबला असला तरी दैवी सूरांमधून व सुमधुर आवाजातून भारतीयांच्या अंतकरणात लता दीदींनी लावलेला स्नेहदीप सदैव चैतन्याने त्या आठवणींना उजाळा देत राहतील.

Comments
Add Comment