Monday, July 15, 2024
Homeक्रीडाभारत जेतेपदासाठी प्रबळ दावेदार

भारत जेतेपदासाठी प्रबळ दावेदार

१९ वर्षांखालील वनडे वर्ल्डकप; इंग्लंडविरुद्ध आज फायनल

नॉर्थ साउंड (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या १९ वर्षांखालील वनडे वर्ल्डकपचा महाअंतिम फेरीचा सामना माजी विजेता भारत आणि इंग्लंड यांच्यात शनिवारी (५ फेब्रुवारी) नॉर्थ साउंड येथील स्टेडियमवर रंगेल. संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य असलेला यश धूलच्या नेतृत्वाखालील भारताचा संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे.

१९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये भारताने सलग चौथ्यांदा आणि एकूण आठव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. माजी विजेत्यांनी आतापर्यंत सर्वाधिक ४ विजेतेपद मिळवली आहेत. आता ऐतिहासिक पाचवे विजेतेपद पाचवे विजेतेपद मिळवण्यापासून भारत फक्त एक पाऊल दूर आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने गतविजेता अफगाणिस्ताचा १५ धावांनी पराभव केला. इंग्लंडने २४ वर्षानंतर अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. त्यांनी १९९८ मध्ये फायनल प्रवेश केला होता आणि विजेतेपद मिळवले होते. इंग्लंडचे १९ वर्षाखालील वर्ल्डकपमधील हे पहिले आणि एकमेव विजेतेपद आहे.

बहारदार फलंदाजी ही भारताची सर्वात जमेची बाजू आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताकडून तीन शतके आणि चार अर्धशतके नोंदवली कर्णधार यश धूल आणि सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी चांगलेच फॉर्मात आहेत. दोघांनी प्रत्येकी एक शतक आणि एक अर्धशतक ठोकले आहे. सेंच्युरी मारण्यात बावानेही स्थान पटकावले आहे. उपकर्णधार रशीद आणि हरनूर सिंगने प्रत्येकी एकदा पन्नाशी पार केली आहे. गोलंदाजीचा भार एकट्या व्हिकी ओत्सवालने उचलला आहे. या डावखुऱ्या फिरकीपटूने ५ सामन्यांत डझनभर विकेट घेत सातत्य राखले आहे. त्याला सिंधू आणि रवी कुमारची चांगली साथ लाभली आहे.

इंग्लंडकडून टॉम प्रेस्टने सातत्य राखताना प्रत्येकी एक शतक आणि अर्धशतक मारले आहे. मात्र, त्यांच्याकडून आठ अर्धशतकांची नोंद झाली आहे. बेलसह बेथेल आणि थॉमसने प्रत्येकी दोन हाफ सेंच्युरी मारल्या आहेत. इंग्लिश संघाची गोलंदाजी मात्र, प्रभावी आहे. बॉयडेन यांनी ५ सामन्यात १३ विकेट घेतल्यात. मात्र, रेहन अहमदने ३ सामन्यांत १२ विकेट घेत गोलंदाजी अधिक मजबूत केली आहे. परंतु, भारताच्या दमदार फलंदाजीसमोर इंग्लिश गोलंदाजांचा कस लागेल.

आमनेसामनेतही भारताचे पारडे जड

युवा विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यातील मागील पाच लढतींमध्ये भारताने ३-२ असे वर्चस्व राखले आहे. २०१९मधील शेवटच्या सामन्यात मात्र, पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली आहे.

विराट कोहलीचा ‘यंगिस्तान’सोबत संवाद

भारताच्या यंग ब्रिगेडला फायनलआधी थेट विराट गुरूजींचं मार्गदर्शन लाभलं. विराट कोहलीने भारतीय संघातील काही खेळाडूंशी झूम कॉलवरून संवाद साधला. भारताला दमदार विजय मिळवून देणारा कर्णधार यश धूल, राज्यवर्धन हर्गेगेकर आणि कौशल तांबे या तिघांशी विराटने झूम कॉलवरून गप्पा मारल्या आणि फायनलआधी महत्त्वाच्या टिप्स देत मार्गदर्शन केलं. तसंच, फायनलपर्यंत पोहोचण्यात यश मिळाल्याने अभिनंदन केलं.

विराट भैय्या, तुम्ही केलेल्या मार्गदर्शनामुळे क्रिकेटमधील आणि आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. तुमच्या मार्गदर्शनाचा आम्हाला भविष्यात खेळ सुधारण्यासाठी नक्कीच फायदा होईल”, असं राज्यवर्धनने लिहिलं. तर “एका महान खेळाडूकडून फायनलआधी काही खास टिप्स”, असं म्हणत कौशल तांबे याने फोटो पोस्ट केला. विराटच्या नेतृत्वाखाली २००८ साली क्वालालंपूर येथे दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून भारताने १९ वर्षाखालील स्पर्धेत विश्वचषक जिंकला होता. तशीच किमया आता यश धूलच्या संघाला इंग्लंडविरूद्ध करून दाखवावी लागणार आहे.

रोहितकडून मार्गदर्शन

वर्ल्डकपसाठी वेस्ट इंडिजला रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयच्या बंगळूरुतील राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमीमध्ये ( एनसीए) रोहित शर्माने युवा खेळाडूंना मार्गदर्शन केलं होतं. त्यानंतर भारताने दमदार कामगिरी करत फायनलपर्यंत धडक मारली. तशातच आता रोहितनंतर विराटनेही युवा खेळाडूंना मार्गदर्शन केलं आहे. त्यामुळे आता तर भारतीय खेळाडू आणखी जोर लावून खेळतील आणि विश्वचषक जिंकतील अशी अपेक्षा सारेच व्यक्त करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -