मुंबई (प्रतिनिधी) : १९९६ विश्वचषक स्पर्धेपासून एकदिवसीय (वनडे) क्रिकेटमध्ये मोठे स्थित्यंतर घडले, असे मत विक्रमवीर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.
भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न मी बाळगले होते, हे मी पूर्णत: मान्य करतो. माझ्या बालपणीच्या काळात कसोटी क्रिकेटला अतिशय महत्त्व होते. पण एकदिवसीय क्रिकेटमध्येही छाप पाडण्यासही मी उत्सुक होतो, असे सचिनने पुढे म्हटले. भारतीय संघ रविवारी एकदिवसीय क्रिकेटमधील एक हजारावा सामना खेळणार आहे. आतापर्यंतच्या भारताच्या ९९९ एकदिवसीय सामन्यांपैकी सर्वाधिक ४६३ सामन्यांमध्ये सचिनने प्रतिनिधित्व केले आहे.१९९१मध्ये आर्थिक उदारीकरण झाले, याच काळात तेंडुलकर नावाचा ब्रँड उदयास आला.
१९९१मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी सामन्यानंतर एकदिवसीय सामने खेळताना चेंडूच्या रंगाशी जुळवून घेण्याचे मानसिक आव्हान होते, असेही सचिनने आवर्जून सांगितले. भारताच्या वनडे क्रिकेट कारकीर्दीतील २००, ३००, ४००, ५००, ६००, ७०० आणि ८००व्या सामन्यामध्ये सचिनने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सचिनने वनडे क्रिकेटमध्ये एकूण १८,४२६ धावा केल्या आहेत.