अनिल कुलकर्णी
प्रसिद्ध प्रकाशक अरुण जाखडे यांचं अकस्मात जाणं अनेकांना धक्का देऊन गेलं. अरुण जाखडे हे प्रकाशनविश्वातलं मोठं नाव होतं. जाखडे यांचे वडील शेतकरी. शेतकरी कुटुंबातले जाखडे ‘बजाज टेंपो’मधली नोकरी करता करता योगायोगाने प्रकाशन क्षेत्राकडे ओढले गेले. या क्षेत्राची आवड निर्माण झाल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि स्वत:ला पूर्णपणे प्रकाशन व्यवसायात झोकून दिलं. प्रकाशन विश्वात जम बसेपर्यंतचा काळ कोणत्याही प्रकाशकासाठी थोडा कठीण असतो. नवोदित प्रकाशकांकडे मातब्बर लेखक सहसा जात नाहीत. मात्र सुरुवातीच्या या संघर्षाच्या कालखंडात जाखडेंना रवी मुकुल तसंच अन्य सहकाऱ्यांची खूप मदत झाली. सर्वसाधारणपणे प्रकाशकांकडे संपादक मंडळ असतं. पण जाखडेंकडे असं कोणतंही संपादक मंडळ नव्हतं. हे खरं तर जाखडे यांचं वैशिष्ट्यच म्हटलं पाहिजे. जाखडे अत्यंत अभ्यासू, संशोधक आणि उत्कृष्ट संपादक होते. प्रत्येक पुस्तकाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी त्यांना लाभली होती. वाङ्मयनिर्मितीवर नजर टाकली, तर लक्षात येतं की, त्यांनी समीक्षात्मक संशोधन वृत्तीची पुस्तकं काढली. जाखडे हे एखादा प्रकल्प घेऊन काम करणारे प्रकाशक होते. उदाहरणार्थ त्यांनी रा. चिं. ढेरेंची सगळी पुस्तकं काढली. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते पुस्तकाला न्याय देणारा चित्रकार शोधायचे. तसंच त्याची मांडणी मनासारखी होईपर्यंत स्वत: बसून पुस्तकाचा ले आऊट करून घ्यायचे. प्रत्येक पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेत ते स्वत:ला झोकून देत असत.
प्रत्येक प्रकाशकाने नैतिकता पाळली पाहिजे, या मताशी ते ठाम होते. जाखडेंनी मराठी प्रकाशनविश्वात नवनवे प्रयोग केले. स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. त्यांनी प्राध्यापक गणेश देवींसोबत बोलीभाषांचे खंड काढले. हे खूप मोठं आणि महत्त्वाचं काम केलं. त्यांनी ऐतिहासिक काम करून अजरामर अशा अक्षर वाङ्मयाची निर्मिती केली. त्यांनी कर्वेंच्या साहित्याचे खंड काढले. कर्वेंचं साहित्य हा ऐतिहासिक आणि अजरामर ठेवा आहे आणि त्याची निर्मिती व्हायला हवी, या विचाराने त्यांनी काम केलं. त्यांनी कधीही पैशांचा विचार केला नाही. जाखडे कधीही व्यावहारिक वागले नाहीत. त्यांनी छोट्या विक्रेत्यांना सांभाळून घेतलं. त्यामुळे त्यांना मानणाऱ्या विक्रेत्यांची संख्याही फार मोठी आहे. पुस्तकांवर बीआरटी कर लागू केल्यानंतर मी आणि ते उच्चस्तरापर्यंत जाऊन भांडलो आणि हा कर रद्द करायला लावला. त्यांनी पुस्तकांवरचा जकात करही मागे घ्यायला लावला. ते मराठी प्रकाशकांसाठी लढले. मराठी प्रकाशकांवर आलेली संकटं मराठी प्रकाशन परिषदेमार्फत दूर करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाकाळात प्रकाशन संस्था, पुस्तकांची दुकानं बंद होती. या काळात प्रकाशक, पुस्तक विक्रेते हवालदील झाले असताना जाखडे पुढाकार घेऊन उच्च न्यायालयात गेले. पुस्तकं ही जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे इथून पुढे कोविडच्या काळात प्रकाशन व्यवसाय बंद करू नये, असा निर्णय त्यांनी उच्च न्यायालयातून घेतला. अरुण जाखडे हे प्रकाशकांचा आधारस्तंभ होते. त्यांच्या जाण्याने हा आधारस्तंभ हरपला आहे. लेखकाकडून एखादा विषय लिहून घेण्यात जाखडेंचा हातखंडा होता.
मेहता पब्लिकेशन्सचे सुनील मेहता हे सुद्धा प्रकाशन विश्वातलं मोठं नाव. सुनील मेहतांना नाही म्हटलं तरी वडिलांची पुस्तकंविक्रीची पार्श्वभूमी होती. नंतर वडिलांनी पुण्यात येऊन प्रकाशन संस्था स्थापन केली आणि सुनील मेहतांच्या ताब्यात दिली. त्यामुळे सुनील मेहता अगदी तरुण वयात या व्यवसायात आले. त्या कालखंडात सुनील मेहतांभोवती अनिल मेहता या नावाचं वलय होतं. त्यामुळे त्यांच्या प्रकाशन संस्थेला त्या त्या काळात नामवंत लेखक मिळत गेले. तसंच पुढच्या काळात त्यांच्याकडच्या लेखकांनी अनेक मान्यवर लेखक मेहता पब्लिशिंग हाऊसला मिळवून दिले. त्यामुळे सुनील मेहतांसाठी प्रकाशन विश्वातला सुरुवातीचा काळ थोडा सुसह्य ठरला. त्यांनी परदेशातल्या प्रकाशन व्यवसायाचा बारकाईने अभ्यास केला. इतकंच नव्हे, तर हिंदी, गुजराती आदी भारतीय भाषांमधल्या प्रकाशन विश्वाचा आढावा घेतला. त्यांनी कायम जागतिक, राष्ट्रीय तसंच स्थानिक पातळीवरील ग्रंथ प्रदर्शनांना भेटी दिल्या. आपली जिज्ञासू वृत्ती तसंच चिकाटीच्या बळावर प्रकाशनाच्या क्षेत्रात मोठी भरारी घेतली. इंग्रजी पुस्तकं अनुवादित करून मराठीत आणण्याचं मोठं काम सुनील मेहतांनी केलं.
पूर्वी इतर भाषांमधली पुस्तकं मराठीत येण्याचं आणि मराठीतली पुस्तकं अन्य भाषांमध्ये अनुवादित होण्याचं प्रमाण अत्यल्प होतं. पण सुनील मेहतांनी अनुवादाला प्राधान्य दिलं. मुखपृष्ठाच्या चित्राबाबतही त्यांचा पूर्ण अभ्यास असायचा. सुनील मेहता म्हणजे योग्य जजमेंट आणि प्रचंड अभ्यास असणारा प्रकाशक, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. मेहतांच्या जाण्याने एक प्रयोगशील प्रकाशक हरपला आहे. ही मराठी प्रकाशन विश्वाची मोठी हानी आहे. मेहतांसारखा प्रचंड निर्णयक्षमता असणारा, धाडसी, प्रयोगशील प्रकाशक सध्या तरी नजरेत येत नाही. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणं खरंच खूप अवघड आहे.
चित्रकार देवीदास पेशवे यांचा कर्करोगाने अकाली झालेला मृत्यूही मनाला चटका लावणारा आहे. देवीदास पेशवेंनी मोजक्याच प्रकाशकांसोबत काम केलं. ऐतिहासिक, पौराणिक तसंच देवीदेवतांची चित्र काढण्यात पेशवेंचा हातखंडा होता. या विषयांशी संबंधित चित्रांमध्ये त्यांनी मोठं काम करून ठेवलं आहे. आजच्या काळात देवीदास पेशवेंसारखे चित्रकार खूपच दुर्मीळ आहेत. म्हणूनच त्यांच्या जाण्याने कलाविश्वाची मोठी हानी झालेली आहे. आजच्या काळातले युवा चित्रकार संगणकावर चित्र शोधतात, फोटोशॉपमध्ये काम करतात. पण देवीदास पेशवे स्वत: पेंटिंग्ज तयार करायचे आणि नंतर स्कॅन करायचे. त्यांची काम करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी होती.
ते झोकून देऊन काम करायचे. त्यांच्यासारखा चित्रकार सध्या तरी माझ्या पाहण्यात नाही. अत्यंत चोख आणि बरहुकूम काम हे देवीदास पेशव्यांचं अजून एक वैशिष्ट्य होतं. आपलं काम प्रकाशकाला पसंत पडायलाच हवं, असा त्यांचा आग्रह असायचा. त्यांच्याकडे एक वेगळीच कलात्मक दृष्टी होती. पुस्तकाच्या विषयाच्या आनुषंगाने ते स्क्रीन परसेंटेज वापरून रेखाचित्रं साकारायचे. त्यामुळे पुस्तकाला एक वेगळाच साज चढायचा. त्यांनी अनेक वर्षं लग्नपत्रिका तसंच ग्रीटिंग्जवरही भरपूर काम केलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते गेली ३० वर्षं कलाक्षेत्रात कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्रासह प्रकाशनविश्वातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
देवीदास पेशवे रोखठोक आणि परखड स्वभावाचे होते. एखादी गोष्ट पटली नाही, तर ते स्पष्टपणे बोलून दाखवत असत. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे काही लोक दुखावले गेले असले तरी कोणाला दुखावण्याचा त्यांचा उद्देश कधीच नसायचा. देवीदास पेशवेंसारखा चित्रकार अशा पद्धतीने प्रकाशन विश्वातून अकाली निघून जाणं हे प्रकाशन विश्वाचं मोठं नुकसान आहे आणि ही पोकळी लगेच भरून निघणारी नाही. अरुण जाखडे, सुनील मेहता आणि देवीदास पेशवे या अनमोल अशा रत्नांनी घेतलेली अकाली एक्झिट प्रकाशन विश्वाचं मोठं दुर्दैव आहे.