Friday, March 21, 2025
Homeदेशसाधूवस्त्रे परिधान करणा-या योगी आदित्यनाथांकडे एक लाखाची रिव्हॉल्व्हर, ८० हजारांची रायफल!

साधूवस्त्रे परिधान करणा-या योगी आदित्यनाथांकडे एक लाखाची रिव्हॉल्व्हर, ८० हजारांची रायफल!

योगी आदित्यनाथांनी जाहीर केली संपत्ती

गोरखपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नेहमी भगव्या साधुवस्त्रांमध्ये दिसतात. या योगी आदित्यनाथांकडे एक लाखाची रिव्हॉल्व्हर आणि ८० हजारांची रायफल असल्याचे त्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. परंतु साधूवस्त्रे परिधान करणा-या योगींकडे ही शस्त्र कशासाठी, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात १ कोटी ५४ लाख ९४ हजार ०५४ रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये रोख रक्कम, सहा बँक खात्यांची शिल्लक आणि बचत यांचा समावेश आहे. योगी आदित्यनाथ यांनी असेही घोषित केले की त्यांच्याकडे १२ हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल फोन, एक लाख रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर आणि ८० हजार रुपये किमतीची रायफल असल्याचे नमूद केले आहे.

योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी गोरखपूर शहरी विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गोरखपूरचे पाच वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात गोरखपूर शहरी जागेवर ३ मार्च रोजी मतदान होणार आहे.

प्रतिज्ञापत्रात असेही म्हटले आहे की योगी आदित्यनाथ यांच्याकडे ४९ हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन आणि १० ग्रॅम वजनाचे रुद्राक्ष गळ्यातील दागिने आहेत.त्यांच्या प्रतिज्ञापत्रात योगी आदित्यनाथ यांनी आर्थिक वर्ष २०२०-२१मध्ये १३ लाख २० हजार ६५३ रुपये, आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये १५लाख ६८ हजार ७९९ रुपये उत्पन्न, आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये १८ लाख २७ हजार ६३९ रुपये उत्पन्न आणि आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी १४ लाख ३८ हजार ६७० रुपये उत्पन्न घोषित केलं आहे.

योगी आदित्यनाथ यांच्याकडे त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार कोणतीही कृषी किंवा अकृषिक मालमत्ता नाही. त्याच प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे की त्यांच्या नावावर कोणतेही वाहन नोंदणीकृत नाही किंवा त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही.योगी आदित्यनाथ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याविरुद्ध कोणतेही प्रलंबित गुन्हेगारी खटले नाहीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -