पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग येत्या सोमवारपासून पूर्ण वेळ सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी राज्यात नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे सांगत, मृत्यूमध्ये होणाऱ्या वाढीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. नवीन रुग्ण संख्येत जगभरात घट होतेय, मात्र मृत्यू वाढत असल्याचे सांगत, राज्यात कोरोना रूग्णसंख्येत ४२ टक्के घट झाली आहे. तर, पुण्यात ५० टक्के घट झाली असून, लसीकरण देखील १ लाख ३३ हजार लोकांचं झालं आहे. ८६ टक्के लोकांना दुसरा डोस देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
१५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लस उपलब्ध करून देणार असल्याचं विभागीय आयुक्तांनी सांगितलं, असं पवार म्हणाले. लसीची कमतरता पडणार नाही यासाठी सर्व प्रयत्न करणार आहे, असे ते म्हणाले.