मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय दिवसेंदिवस खोलात जाताना दिसत आहे. १०० कोटींच्या वसुली प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत नवी भर पडली आहे. अशातच आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (PMLA) न्यायालयाने आता अनिल देशमुख यांच्या दोन्ही मुलांकडे वक्रदृष्टी वळविली आहे. विशेष न्यायालयाने शुक्रवारी आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अनिल देशमुख, त्यांची दोन्ही मुले आणि संबंधितांना ५ एप्रिलपूर्वी न्यायालयसमोर हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी झालेल्या सुनावणीत ईडीने विशेष न्यायालयात अनिल देशमुख, त्यांची मुले ह्रषिकेश व साहिल देशमुख आणि अन्य नऊ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्राची दखल घेत विशेष न्यायालयाने शुक्रवारी संबंधितांना कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अनिल देशमुख यांना गेल्यावर्षी २ नोव्हेंबर रोजी अटक झाली होती. तेव्हापासून अनिल देशमुख तुरुंगातच आहेत. त्यांनी PMLA न्यायालयासमोर जामिनासाठी अनेक अर्ज केले. परंतु, प्रत्येकवेळी त्यांची विनंती फेटाळून लावण्यात आली.
सीताराम कुंटे यांच्यानंतर सचिन वाझे यानेही अनिल देशमुख यांना अडचणीत आणणारा जबाब ईडीला दिल्याची माहिती समोर आली आहे. अनिल देशमुख यांनीच मला पोलीस दलात पुन्हा येण्याविषयी सुचवले. राज्य सरकारमधील अनेक वरिष्ठ नेते यासाठी तयार नव्हते. मात्र, मी त्यांना समजवेन, असे अनिल देशमुख यांनी मला सांगितले होते. तसेच पोलीस दलात पुन्हा येण्यासाठी २ कोटी रुपयांची मागणीही अनिल देशमुख यांनी केली होती. परंतु, मला इतके पैसे देणे शक्य नसल्याचे मी अनिल देशमुख यांना कळवले होते. तरीही अनिल देशमुख यांनी मला परमबीर सिंह यांच्याकडे पोलीस दलात पुन्हा रुजू होण्यासाठीचा विनंती अर्ज देण्यास सांगितले. त्यानंतर मी अनिल देशमुख यांच्या मर्जीप्रमाणे पोलीस दलात पुन्हा रुजू झालो, असे सचिन वाझेने ‘ईडी’ला सांगितल्याचे समजते.
मी पोलीस दलात रुजू झाल्यानंतर माझ्याकडे गुप्तवार्ता विभाग( CIU) आणि अन्य महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. अनिल देशमुख यांनी मला बार आणि रेस्टॉरंटसकडून वसुली करण्यास सांगितले. त्यानंतर मी डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०१२१ या काळात अनिल देशमुख यांना ४ कोटी ७० लाख रुपये दिले. हे सर्व पैसे अनिल देशमुख यांचा स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे याच्या माध्यमातून पोहोचवण्यात आल्याचा जबाब सचिन वाझेने दिल्याचे समजते. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.a