मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. या निवडणुकीत भाजपकडून संपूर्ण ताकद पणाला लावण्यात येईल. त्यादृष्टीने भाजपकडून मुंबई निवडणुकीसाठी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चर्चा करुन २५ समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांची नावे शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आली. यामध्ये आमदार आशिष शेलार यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आशिष शेलार हे निवडणूक संचालन समितीचे अध्यक्ष असतील. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही आशिष शेलार यांच्या नेतृत्त्वात लढली जाणार, हे आता स्पष्ट झाले आहे. या निवडणूक संचालन समितीमध्ये खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक आणि किरीट सोमय्या हे विशेष आमंत्रित असतील.
जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी खासदार पूनम महाजन यांची नियुक्ती करण्यात आली असून माध्यम विभाग समिती अध्यक्षपदाची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.निवडणूक संचालन समितीत खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक, किरीट सोमय्या हे निमंत्रक असून आमदार राहुल नार्वेकर, कालिदास कोळंबकर,नितेश राणे, प्रकाश मेहता हे सदस्य असतील. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची प्रशासन समन्वयपदी नेमणूक करण्यात आली आहे. आचार्य पवन त्रिपाठी आणि आमदास विद्या ठाकूर यांच्याकडे विशेष संपर्क प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे. महिला संपर्क समितीची जबाबदारी शलाका साळवी, शीतल गंभीर यांच्याकडे आहे. संजय पांडे यांच्याकडे प्रवाशी कार्यकर्ता समितीची जबाबदारी आहे.