रूपाली केळस्कर
भारतात हवा, जल आणि अन्य प्रदूषणांचा प्रश्न बिकट होत असताना सरकारने आता कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्याच्या उपाययोजनांवर भर दिला आहे. दुसरीकडे लोकांमध्येही प्रदूषणाची जाणीव व्हायला लागली आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं जात आहे. त्याच वेळी एक चांगली बातमी आली आहे, ती म्हणजे देशात वनाखालील जमिनीचं प्रमाण वाढत असल्यानं नागरिकांना श्वास घेणं सुकर होईल.
जगभर प्रदूषणाच्या दुष्परिणामांची जाणीव झाली आहे. नागरिक जागरूक होत आहेत. स्वतःचं प्रदूषण कमी करण्याच्या उपायांवर भर देत आहेत. प्रदूषण जास्त असणाऱ्या ठिकाणी जाणं कसं टाळता येईल, यावर भर देत आहेत. दिल्लीतील गजबजलेल्या भागांमधलं प्रदूषण आणि तिथे नागरिकांचा नियमित असलेला वावर याचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. दिल्लीतल्या वायू प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे बाजारपेठ, व्यावसायिक आणि पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्यांची संख्या ३३ टक्क्यांनी कमी झाली आहे. एका नवीन अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. हवामान तंत्रज्ञान स्टार्ट अप कंपनी ‘ब्लू स्काय अॅनालिटिक्स’ आणि ‘निअर’ या डेटा अॅनालिटिक्स कंपनीने संयुक्तपणे हा अभ्यास केला. नवी दिल्लीतली लोकप्रिय शॉपिंग केंद्रं, पर्यटनस्थळं असलेल्या करोल बाग, लोधी गार्डन आणि कॅनॉट प्लेस या भागात जाणाऱ्या लोकांची संख्या आणि प्रदूषणाची पातळी यांचा अभ्यास करण्यात आला. ऑक्टोबर २०१९ ते मार्च २०२० या सहा महिन्यांच्या कालावधीत हा अभ्यास करण्यात आला. त्याचे निष्कर्ष दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले. हा कालावधी आठवड्यांमध्ये विभागला गेला आणि अभ्यासातला ‘पहिला आठवडा’ १ ऑक्टोबर २०१९ पासून घेण्यात आला.
संशोधकांनी वाढत्या प्रदूषण पातळीची तुलना या भागाला भेट देणाऱ्या लोकांच्या संख्येशी केली. यामध्ये ‘मशीन लर्निंग’ तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली. त्यावेळी अभ्यासात आढळून आले की, पीएम २.५ कणांचं प्रमाण ३३६ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर होतं, तेव्हा कॅनॉट प्लेसमध्ये जाणाऱ्यांची संख्या दररोज १७ हजारांवरून १४ हजारांपर्यंत घसरली. त्याचप्रमाणे नोव्हेंबरच्या सुरुवातीला करोलबागमध्ये प्रदूषणाची पातळी २५ टक्क्यांनी वाढल्याने तिथे जाणाऱ्यांच्या संख्येत ३३ टक्क्यांनी घट झाली आहे. पुढे पीएम पातळी ४४३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवली गेली आणि ग्राहकांनी तिथे न जायचा निर्णय घेतला, असं अहवालात म्हटलं आहे. ऑक्टोबरअखेर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत लोधी गार्डन परिसरात येणाऱ्या लोकांची संख्या दररोज ९०० वरून ७०० पर्यंत घसरली.
भारत प्रदूषणाच्या गंभीर समस्येतून जात आहे. लोकांना श्वास घेणं कठीण झालं आहे. प्रदूषणामुळे मास्क घालून घराबाहेर पडणं ही लोकांची मजबुरी बनली होती. त्याच वेळी, नवीन अहवालानुसार, बंगळूरुच्या वायू प्रदूषणाबाबत एक धक्कादायक माहिती पुढे आली. इथल्या वायू प्रदूषणाची पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांपेक्षा जास्त आहे. यामुळे २०२० मध्ये बंगळूरु शहरात सुमारे १२ हजार मृत्यू झाले. ग्रीनपीस इंडियाच्या अहवालानुसार, दक्षिण भारतातल्या इतर शहरांच्या तुलनेत बंगळूरुमधली प्रदूषणाची पातळी खूपच भयानक आहे. इथल्या दहा ठिकाणच्या हवेच्या गुणवत्तेचं निरीक्षण करण्यात आलं. पीएम-२.५ आणि पीएम-१०च्या वार्षिक सरासरीच्या आधारे नमुने घेण्यात आले. या आधारे असं आढळून आलं की, सर्व ठिकाणच्या वायू प्रदूषणाची पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांपेक्षा जास्त आहे.
सतत वाढत जाणारं वायू प्रदूषण हे संपूर्ण जगासाठी मोठं आव्हान बनत आहे. वायू प्रदूषणाचं कारण केवळ औद्योगिकीकरण किंवा कार्बन उत्सर्जन नाही, तर जगातल्या सर्वच देशांमध्ये सतत वाढत जाणारी वाहतूक हेही यामागं मोठं कारण आहे. वाहतुकीतून निघणारा विषारी धूर मानवाच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी किती घातक आहे, हे एका अभ्यासातून समोर आलं आहे. अमेरिकेतल्या जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, वाहतूक प्रदूषणामुळे जगभरात दर वर्षी सुमारे वीस लाख मुलांमध्ये दमा होऊ शकतो. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ’ जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. वायू प्रदूषणामुळे आपल्या शरीराचे अवयव खराब होतात. यामध्ये क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, ब्रोन्कियल अस्थमा यांचाही समावेश होतो. दमा हा एक जुनाट आजार आहे. तो जडल्यास फुप्फुसीय वायुमार्गात जळजळ होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो, छातीत दुखतं. खोकला आणि घरघर होते. दम्याचा झटका येण्याचं मुख्य कारण म्हणजे शरीरातील श्लेष्मा आणि श्वासनलिका अरुंद होणं; याशिवाय दम्याचा झटका येण्यामागे अनेक बाह्य कारणं आहेत.
जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या पर्यावरण आणि व्यावसायिक आरोग्याच्या प्राध्यापक आणि या अभ्यासाच्या सहलेखक सुसान एनेनबर्ग यांच्या मते नायट्रोजन डायऑक्साइडमुळे मुलांमध्ये दमा होऊ शकतो. ही समस्या शहरी भागात जास्त आहे. यावरून हे स्पष्ट होतं की, मुलांना निरोगी ठेवायचं असेल तर हवा स्वच्छ राखण्यासाठी धोरण आखणं महत्त्वाचं आहे. सुसान अॅनेनबर्ग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहनं, पॉवर प्लांट्स आणि औद्योगिक साइट्सच्या आसपास नायट्रोजन डायऑक्साइडच्या जमिनीच्या एकाग्रतेचा अभ्यास केला. यासह, त्यांनी २०१९ ते २०२० या कालावधीत मुलांमध्ये दम्याच्या नवीन प्रकरणांचा मागोवा घेतला. यादरम्यान असंही आढळून आलं की, २०२० मध्ये नायट्रोजन ऑक्साइडमुळे मुलांमध्ये दम्याचं प्रमाण १६ टक्के झालं होतं. त्या अगोदरच्या वर्षात ते वीस टक्के होतं. याचा अर्थ कोरोनामुळे लागलेल्या निर्बंधाच्या काळात युरोप आणि अमेरिकेच्या काही भागांमध्ये, स्वच्छ हवेचा फायदा विशेषतः गजबजलेल्या रस्त्यांजवळ आणि औद्योगिक साइट्सजवळ राहणाऱ्या मुलांना झाला. उच्च उत्पन्न असलेल्या देशांनी नायट्रोजन ऑक्साईडच्या उत्सर्जनावर अधिक प्रभावीपणे अंकुश ठेवण्याची अजूनही गरज आहे.
दुसऱ्या एका अभ्यासात, सुसान ऍनेनबर्ग आणि तिच्या सहकाऱ्यांना आढळून आलं की, २०१९ मध्ये झालेले १.८ दशलक्ष मृत्यू शहरी वायू प्रदूषणाशी जोडले जाऊ शकतात. शहरांमध्ये राहणारे ८६ टक्के प्रौढ आणि मुलं जागतिक आरोग्य संघटनेने निर्धारित केलेल्या मानकांपेक्षा जास्त पातळी असलेल्या वातावरणात राहण्यामुळे आजारी पडतात. जीवाश्म इंधन वाहतूक कमी केली तरच मुलं आणि वृद्धांना चांगल्या हवेत श्वास घेण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे मुलांमध्ये दमा आणि त्यांचा मृत्यूही कमी होऊ शकतो. यासोबतच हरितगृह वायूचं उत्सर्जनही कमी होईल. त्यामुळे निरोगी वातावरण निर्माण होऊ शकेल.