मुंबई (प्रतिनिधी) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेच जर अनिल परब यांच्यावर आरोप करत आहेत, तर त्यांनी राजीनामाच दिला पाहिजे, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.
भारतीय जनता पार्टीदेखील या सरकारचा काळा चिठ्ठा खोलण्याच्या तयारीतच आहे. हे फार काळ चालणार नाही. अब जनता आई है, सिंहासन खाली करो, अशी वेळ या सरकारवर लवकरच येणार असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.
दरम्यान शेतकऱ्यांना तुम्ही काय दिले, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
शेतकऱ्यांबबत इतकीच आपुलकी होती, मग त्यांना तुम्ही काय काय दिलेत, याची यादी एकदा जाहीर करा, असे पाटील यावेळी म्हणाले. नुकसानभरपाई नाही, कर्जमाफी नाही, विम्याचा पत्ता नाही, प्रोत्साहन अनुदान नाही, मग या सर्व महत्त्वाच्या विषयांकडे महाविकास आघाडी सरकार लक्ष का देत नाही? असा सवाल यावेळी पाटील यांनी केला.
राज्यातील पोलीस बदल्यांवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. पोलीस बदल्यांची यादी अनिल परबच आपल्याकडे द्यायचे, असा अनिल देशमुखांचा जबाब ईडीच्या चार्जशीटमध्ये नोंदविण्यात आला आहे. मला कुठल्याही व्यक्तीनं यादी दिलेली नव्हती, तर अनिल परब यांनी यादी दिली होती. तिच यादी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती असं अनिल देशमुख यांनी जबाबात नमूद केलं आहे. याचबरोबर अनिल देशमुखांनी आणखी एक धक्कादायक माहिती दिली आहे. कदाचित अनिल परब यांना शिवसेनेच्या आमदारांकडून ही यादी मिळायची आणि माझ्याकडे द्यायचे, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. देशमुख यांच्या या नव्या आरोपामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान अनिल परब यांनी राजीनामाच द्यावा, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे.