मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात पोलीस बदल्यांच्या याद्या अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्या माध्यमातून येत असल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांनी अनिल परबांवरील आरोपांवरून परमबीर सिंग यांच्यावर निशाणा साधला आहे.
यासंदर्भात परमबीर सिंग हेच या प्रकरणाचे मास्टर माईंड असल्याचे सांगतानाच राज्य सरकारला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हणत परमबीर सिंग यांच्यावर निशाणा साधला आहे.
एकीकडे अनिल देशमुख यांनी देखील अनिल परब यांचं नाव घेतलेले असताना आता या सगळ्या प्रकरणावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
“परमबीर सिंग यांची सगळी वक्तव्य राजकीय हेतूने प्रेरित आहे. हा सर्व विषय अँटिलिया बॉम्ब प्लांट प्रकरणापासून सुरू झाला. मनसुख हिरेनची हत्या करण्यात आली. एटीएसच्या तपासात अजून काही सत्य समोर येणार होते. पण, एनआयएनं हा तपास हाती घेतल्यानंतर परमबीर सिंग यांच्या घरी बैठक झाली याचा देखील उल्लेख आहे. इमेलचा उल्लेख आहे. इलेक्ट्रॉनिक पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी पाच लाख रुपये देण्यात आले त्याचाही उल्लेख आहे. एनआयएने सांगितले होते की, आम्ही या प्रकरणात अतिरिक्त चार्जशीट फाईल करणार. पण ते होत नाहीये, असे नवाब मलिक म्हणाले आहेत.