चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचा पुतण्या भुपिंदर सिंग हनी यांना ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपुर्वीच त्यांच्या वेगवेगळ्या मालमत्तांवर ईडीने छापे टाकले होते. ईडी अधिकाऱ्यांनी सुमारे आठ तासांच्या चौकशीनंतर हनीला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए) अंतर्गत अटक केली.
गेल्या महिन्यात, ईडीने पंजाबमधील मोहाली, लुधियाना, रूपनगर, फतेहगढ साहिब, पठाणकोट येथे अवैध वाळू उत्खनन प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या हनी आणि इतरांच्या निवासस्थानी झडती घेतली होती. झडतीनंतर १० कोटींहून अधिक रोख रक्कम, वाळू खाण व्यवसायासंदर्भातली कागदपत्रं, मालमत्ता व्यवहार, मोबाईल फोन, २१ लाख रुपये किमतीचे सोने आणि १२ लाख रुपयांचे रोलेक्स घड्याळ अशा वस्तू सापडल्या, त्या ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने भूपिंदरसिंग हनीच्या निवासस्थानातून 3.9 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली आहे. या छाप्यांमधून आतापर्यंत सुमारे 10.7 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणामुळे चन्नी विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. आम आदमी पक्षाने तर राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांवर कारवाईची मागणी केली आहे. यानंतर पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आम आदमी पार्टीचे पंजाबचे सह-प्रभारी राघव चड्ढा यांनी दिलेल्या तक्रारीवर कारवाई करत, राज्याचे डीजीपी यांना मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावरील आरोपांचा अहवाल देण्याचे निर्देश दिले.