Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

असदुद्दीन ओवेसींवर गोळीबार करणारे अटकेत

असदुद्दीन ओवेसींवर गोळीबार करणारे अटकेत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर गुरुवारी दोन जणांनी गोळीबार केला. या हल्ल्यातील दोन्ही आरोपींना यूपी पोलिसांनी अटक केली असून, पोलिसांच्या चौकशीत त्यांनी या हल्ल्यामागचे कारण सांगितले आहे. सचिन आणि शुभम अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत.


उत्तर प्रदेशमध्ये प्रचार करुन दिल्लीला परतत असताना पश्चिम उत्तर प्रदेशातील हापूरजवळील टोल प्लाझा येथे असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोळीबारानंतर हल्लेखोर शस्त्रे सोडून पळून गेले. या हल्ल्यानंतर ओवेसींनी स्वतः आपण सुरक्षित असल्याचे ट्विटरद्वारे सांगितले.


दरम्यान, दोन्ही आरोपींनी पोलिसांच्या चौकशीत या हल्ल्यामागचे कारण सांगितले आहे. आरोपी ओवेसींच्या भाषणांनी आणि वक्तव्यांनी संतापले होते. यामुळेच त्यांनी ओवेसींवर हल्ला करण्याचा कट रचला. कितापूर, मेरठ येथून प्रचार आटोपून दिल्लीला परतत असताना छाजरसी टोल प्लाझाजवळ या दोघांनी ओवेसींच्या वाहनावर गोळीबार केला, असे हापूरचे एसपी दीपक भुकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment