Friday, May 9, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी) : हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ९३व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी ही माहिती दिली आहे. मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात रमेश देव यांनी शेवटचा श्वास घेतला. चार दिवसांपूर्वी त्यांनी ९३वा वाढदिवस साजरा केला होता.


रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक, खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या. १९५१ साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘पाटलाची पोर’ या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. १९५६मध्ये राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. राजश्री प्रॉडक्शनच्या १९६२ मध्ये आलेल्या ‘आरती’ सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. रमेश देव यांनी आजपर्यंत जवळपास १८० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. रमेश देव यांनी पत्नी सीमा देव यांच्यासोबत अनेक चित्रपटांसोबत काम केले. त्यांचे अनेक चित्रपट गाजले. १९६२ मध्ये त्यांनी ‘वरदक्षिणा’ चित्रपटात सोबत काम केले. या चित्रपटाच्या वेळीच दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. नंतर उशीर न करता त्यांनी त्याच वर्षी लग्न केले.


अभिनेत्यासह निर्माता, दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२६ रोजी झाला. त्यांचे आजोबा अभियंता होते. त्यांनी राजस्थानातील जोधपूर पॅलेसच्या उभारणीत मोठे योगदान दिल्याने कोल्हापूर शहराच्या उभारणीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी देव यांच्या आजोबांना निमंत्रित केले. त्यामुळे देव कुटुंब कोल्हापुरात स्थायिक झाले. रमेश देव यांचे वडील शाहू महाराजांचे कायदेशीर सल्लागार होते.

Comments
Add Comment