Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीमहत्वाची बातमी

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन आणि वेळापत्रकानुसारच होणार

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन आणि वेळापत्रकानुसारच होणार

मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.


दहावीची लेखी ऑफलाइन परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होणार आहे. त्याची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ दरम्यान होणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च दरम्यान होणार असून १४ ते ३ मार्चदरम्यान श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा होईल अशी माहिती शरद गोसावी यांनी दिली आहे. अपरिहार्य कारण असेल तर विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात येणार आहे.


विद्यार्थ्यांच्या लेखनाचा सराव कमी झाला असल्याने ७० ते ८० गुणांच्या पेपरला अर्धा तास अधिक वेळ दिला जाणार असून ४० ते ६० गुणांच्या पेपरला १५ मिनिटं अधिक वेळ दिला जाईल. कोरोनामुळे परीक्षा देण्याची संधी हुकली तर ३१ मार्च ते १८ एप्रिलदरम्यान पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. तसंच १५ पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर जवळचं महाविद्यालय केंद्र असणार आहे.


दहावीसाठी १६ लाख २५ हजार ३११ आवेदन पत्रं मिळाली असून बारावीसाठी १४ लाक ७२ हजार ५६५ आवेदन पत्रं प्राप्त झाली आहेत. एकूण विद्यार्थ्यांची संख्या ३१ लाख असून इतक्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी असताना ऑनलाइन परीक्षा घेणं शक्य नसल्याचं यावेळी शरद गोसावी यांनी स्पष्ट केलं. जुलैमध्ये पुरवणी परीक्षा घेण्याचं नियोजन आहे. महत्वाचं म्हणजे दहावी बारावीच्या परीक्षेसाठी कोरोना लस बंधनकारक नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.


परीक्षेसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र/उपकेंद्र देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत तिथेच त्यांना लेखी परीक्षा देता येईल. यामुळे त्यांनी परीक्षा देताना परिचित वातावरण मिळेल आणि कमी प्रवास करावा लागेल असं शरद गोसावी यांनी सांगितलं आहे.


कोरोनामुळे अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली असल्याने लेखी परीक्षेचे आयोजन ७५ टक्के अभ्याक्रमावर करण्यात आलं आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रचलित पद्धतीनुसार विशेष सवलती देण्यात येणार आहेत. शाळा तिथं परीक्षा केंद्र असून बहिस्थ नाही तर शाळेतील शिक्षकच सुपरव्हायझर असतील.


परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांना वैद्यकीय अडचण आल्यास केंद्रावर स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. कोरोनामुळे आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा कक्ष असेल. जर एखाद्या विद्यार्थ्यांला परीक्षेदरम्यान लक्षणं दिसली तर त्याला स्वतंत्र कक्षात परीक्षा देण्याची मुभा असेल. तसंच जवळच्या आरोग्य केंद्रामार्फेत परीक्षा केंद्राला आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवली जाईल.


दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान एक ते दीड तास आधी उपस्थित राहावं लागणार आहे. तसंच १० मिनिटं आधी प्रश्नपत्रिका दिली जाईल.

Comments
Add Comment