Tuesday, October 8, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यकोकणात फळपिकांवर संक्रांत...!

कोकणात फळपिकांवर संक्रांत…!

संतोष वायंगणकर

महाराष्ट्रात १४ जानेवारीला मकरसंक्रांत येऊन गेली. मकरसंक्रांतीचा उत्सव अत्यंत उत्साहीपणे साजरा केला. पुढचा पंधरवडा हा संक्रांतीच्या उत्सवाचा वाण, तीळगूळ घेण्याचा खऱ्या अर्थाने आनंदोत्सव असतो; परंतु या वर्षी जानेवारीच्या प्रारंभापासूनच अति उष्मा, कडाक्याची थंडी आणि मुसळधार पाऊस असे काहीसे संमिश्र हवामान होते. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी पडते. या थंडीमध्येच फळझाडांना मोहर बहरतो. कडाक्याच्या थंडीचा आनंद जसा तो वातावरणातील गारव्याने घेतो तसाच त्याचा आनंद पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीने आणि मोहराचा येणारा बहर यामुळे तो मनोमन आनंदी खूश असतो. कोकणातील हापूस आंबा, काजू, कोकम, जांभुळ अशा सर्वच फळपिकांचे उत्पादन हे येणाऱ्या मोहरावर अवलंबून असते; परंतु थंडी आणि पाऊस या हवामानात मोहर कुठे आलाच नाही. मोहोर आणि फळधारणा यावर आंबा, काजू, कोकमचे फळपीक अवलंबून असते. हवामानातील अचानक घडणाऱ्या या बदलाचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे की, कोकणातील शेतकरी खऱ्या अर्थाने चिंताक्रांत आहे.

गेली दोन-अडीच वर्षे कोरोना प्रादुर्भावाचा परिणाम जसा जगावर झाला, तसा तो कोकणावरही झाला आहे. कोकणातील व्यापार, उद्योगही रोडावला आहे. एकापाठोपाठ एक संकटांची मालिका सुरू असताना एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. ग्रामीण भागातील जनता शहरात येत नाही. त्यांचा भाजीपाला, फळ विकण्यासाठी, कामधंद्याच्या निमित्ताने तालुक्याच्या ठिकाणी यायची; परंतु लोक यायचेच थांबले आणि बाजारपेठांचा व्यापार पूर्णपणे थांबला आहे. एसटीने दररोज तालुक्यात हजारो लोक प्रवास करायचे, ये-जा करायचे; परंतु एसटीच्या संपाने सारे ठप्प झाले आहे. याचा हॉटेल, किराणा दुकान यावर फार मोठा परिणाम झाला आहे. ग्रामीण भागातील गोरगरिबांना अन्य खासगी वाहनातून प्रवास करणे परवडत नाही. हे कोकणातील अर्थचक्र अगोदरच थांबले आहे. त्यात पुन्हा वातावरणाच्या परिणामाने येणारी फळपिके बेभरवशाची झाली आहेत. पुढे काय होईल, हे कोणालाच काही सांगता येत नाही. केवळ हवामानाच्या बदलाचा परिणाम फळपिकांपुरता राहत नाही, तर या बदलत्या हवामानाचा परिणाम मच्छी व्यवसायावरही होत असतो.

या हवामानाच्या बदलाने मासेमारीचा व्यवसाय पूर्णपणे थांबला. त्यातच या मासेमारी व्यवसायातील पारंपरिक, पर्ससीनधारक, जिलेटीनने मासेमारी करणारे अशी ही या व्यवसायातील विभागणारी आणि त्यातला सारा संघर्ष हा या व्यावसायिकतेला पुढे जाण्यासाठी अडथळा ठरत आहे. यातच कोकणातील पर्यटन व्यवसाय जोरात चालला असता, तर त्याबाबतीतही फार काही होणारे नाही अशीच स्थिती आहे. अनेक बाबतीत अडथळे निर्माण होत असून कोकणातील शेतकरी बागायतदार आणि व्यावसायिकांसाठीही फार मोठी अडथळ्याची शर्यत आहे. दोन वर्षांत फळपीक काही प्रमाणात येऊनही बाजारपेठांची फार उपलब्धता नसल्याने फळ विक्रीतही अडथळेच राहिले. काजू बागायतदारांनाही मोठा दर मिळू शकला नाही. आंबा बागायतदारांनी कोकणातील काही भागांत बागायतीतच विक्री व्यवस्था निर्माण केली. पुणे, बारामतीसह उर्वरित महाराष्ट्रातील आंबा खरेदी करणारे बागायतीत येऊन आंबा खरेदी करू लागले.

त्यातून काही बागायतदारांना चांगले पैसे मिळाले. आंबा विक्री व्यवसायातील एक आंबा विक्रीची नवी व्यवस्था लॉकडाऊनच्या काळात निर्माण झाली. बागायतदार शेतकऱ्यांनी तत्कालीक कारणांनी निर्माण झालेली ही आंबा विक्री व्यवस्था जोपासली पाहिजे, वाढवली पाहिजे, तरच बागायतदार शेतकऱ्यांना असलेला दलालांचा विळखा सैल होऊ शकेल. अनेक बागायतदार शेतकरी केवळ दलालांवर अवलंबून नाहीत. आंबा बागायतदारांच्या बागायतीत आंब्यांची विक्री होते हे जेव्हा दलालांना समजेल तेव्हा आंबा दराच्या बाबतीत जी मिरासदारी चालते, ती निश्चितपणे थांबेल. काजूच्या बाबतीतही तीच स्थिती आहे. काजू बागायतदार शेतकरी यातल्या कुठल्याच गोष्टीत संघटित नाही. काजूचे प्रोसेसिंग युनिट आहेत; परंतु त्यातही परदेशातून मोठ्या प्रमाणावर काजू बी आयात होते. यात कोकणातील काजूगर पौष्टिक आहे. त्यात सत्त्व अधिक आहे; परंतु त्याचेही आपणाला नीट मार्केटिंग करता आलेले नाही. आता कोकणातील या फळांच्या बाबतीत प्रत्यक्ष फळ पिकांचे उत्पादन हाती येईल, तोच आपला दिवस. तोपर्यंत तरी कोकणातील शेतकरी हा हवामानातील बदलाने फळपिकांवरील संक्रांत दूर होऊन हाती भरघोस उत्पादनाच्या प्रतीक्षेत आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -