Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीसीताराम कुंटेंचा नवा गौप्यस्फोट

सीताराम कुंटेंचा नवा गौप्यस्फोट

पोलीस बदल्यांमधील गैरव्यवहाराची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली होती पण मुख्यमंत्र्यांच्या पत्राला पोलीस महासंचालकांनी केराची टोपली दाखवली

मुंबई : पोलीस बदल्यांमधील गैरव्यवहाराची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली होती पण मुख्यमंत्र्यांच्या पत्राला पोलीस महासंचालकांनी केराची टोपली दाखवल्याचा नवा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केला आहे.

राज्यात पोलीस बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याची कबुली देणारे राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सक्तवसुली संचलनालयासमोर (ED) आणखी एक गौप्यस्फोट केल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी राज्यातील पोलीस बदल्यांमध्ये सुरु असलेल्या गैरव्यवहाराची दखल घेतली होती. त्यादृष्टीने कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना पत्रही पाठवले होते. पण मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर सुबोध जयस्वाल यांनी कोणतेही उत्तर दिले नाही, असा खुलासा सीताराम कुंटे यांनी ‘ईडी’च्या चौकशीत केल्याचे समजते.

जुलै २०२० मध्ये मुंबईतील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याची कुणकूण लागतात मुख्यमंत्र्यांनी या बदल्या रोखण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मी परमबीर सिंह यांना फोन करुन या बदल्या थांबवण्यास सांगितले होते, असा जबाब सीताराम कुंटे यांनी दिला आहे. तसेच या सगळ्या प्रकाराची चौकशीही करण्यात आली होती. राज्य गुप्तचर विभागाच्या (SIU) तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये एजंटसचा सहभाग आहेत का, हे तपासण्यासाठी काही फोन कॉल टॅप केले होते. त्यावेळी रश्मी शुक्ला यांनी एक अहवाल तयार करुन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना पाठवला होता. सुबोध जयस्वाल यांनी तो अहवाल माझ्याकडे दिला. मी तो अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. परंतु, रश्मी शुक्ला यांनी ज्या काळात फोन कॉल टॅप केले तेव्हा एकाही अधिकाऱ्याची बदली झाली नव्हती. परंतु, उद्धव ठाकरे यांनी या सगळ्याची गंभीर दखल घेत तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना एक पत्र पाठवले. त्यामध्ये दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई करावी, अशी विचारणाही मुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु, सुबोध जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या या पत्राला उत्तरच दिले नाही, असे सीताराम कुंटे यांनी म्हटले.

यापूर्वी सीताराम कुंटे यांनी अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना मला पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, अशी कबुली ‘ईडी’समोर दिल्याची माहिती समोर आली होती. संबंधित पोलीस अधिकाऱ्याची कुठल्या जागी आणि कोणत्या पदावर बदली करायची, हे नमूद केलेले असायचे. अनिल देशमुख यांचा स्वीय सहायक संजीव पालांडे यांच्यामार्फत या अनधिकृत याद्या माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात असत. मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अधीन काम करत असल्याने संबंधित याद्या स्वीकारण्यास नकार देऊ शकत नव्हतो. त्यामुळे पोलीसांच्या बदल्या करताना या नावांचा समावेश केला जायचा, असे सीताराम कुंटे यांनी ईडीला सांगितले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -