मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सन २०२२-२३ चे अर्थसंकल्पीय अंदाज आज सादर करण्यात आले. मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाचा यंदाचा २०२२-२३ या वर्षीचा ३३७०.२४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज पालिकेचे सहआयुक्त अजित कुमार यांनी शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोषी यांना अर्थसंकल्प सादर केला.
कोरोनाच्या काळात गेल्या वर्षभरात शिक्षणावर पुरेसा खर्च झाला नसल्याने यंदाच्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात वाढ झाली आहे. कार्यानुभव शिक्षण आॉनलाईन, टॉय लायब्ररी, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, ई वाचनालय, डिजिटल क्लासरूम, टॅब पुरवठा, असा डिजीटल शिक्षणावर भर देणारा हा अर्थसंकल्प आहे.
मुंबई महापालिकेचे यंदाच्या वर्षीचे शिक्षण बजेट ३ हजार ३७० कोटी २४ लाख रुपयांचे आहे. अर्थसंकल्प ‘ई’ निधी संकेतांक ३० अंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज २७०१.७७ कोटी एवढे असून सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरीता महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज २८७०.२४ कोटी इतके प्रस्तावित आहे.
तसेच अर्थसंकल्प ‘ई’ निधी संकेतांक ३० अंतर्गत सन २०२१-२२ या वर्षाच्या भांडवली अर्थसंकल्पात २४४.०१ कोटीची प्रस्तावित करण्यात आलेली तरतूद सुधारित अंदाजात २७९.२८ कोटी इतकी प्रस्तावित केली आहे. तसेच सन २०२२-२३ या वर्षासाठी भांडवली कामांच्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ५००.०० कोटी एवढी अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्तावित आहे.
मुंबई महापालिकेच्या शैक्षणिक बजेटमध्ये मुंबईतील नव्या शाळांकरता भरीव तरतूद करण्यात आली नसल्याचं दिसतं. मुंबई पब्लिक स्कुलच्या शाळांची संख्या वाढवण्याची घोषणा हवेतच विरली? का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. आदित्य ठाकरेंनी प्रत्येक वॉर्डमध्ये राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय बोर्डाची शाळा सुरु करण्याचा मानस व्यक्त केला होता. मात्र, यंदाच्या बजेटमध्ये केंब्रिज आणि आय.बी बोर्डाच्या प्रत्येकी एक अश्या केवळ दोनच नव्या आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांची घोषणा करण्यात आली आहे. केवळ २ नव्या शाळांकरता १५ कोटींच्या तरतुदीव्यतिरीक्त कोणतीही भरीव तरतूद नाही.