Wednesday, July 24, 2024
Homeमहत्वाची बातमीमुंबई महापालिकेचा ४५,९४९ कोटींचा अर्थसंकल्प सादर

मुंबई महापालिकेचा ४५,९४९ कोटींचा अर्थसंकल्प सादर

८.४३ कोटी रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प

आरोग्य आणि शिक्षणावर विशेष भर

अर्थसंकल्पात १७.७० टक्क्यांची वाढ

महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी भरीव तरतूद

मुंबई : आशियातील सर्वांत मोठ्या आणि श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेचा २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीचा ४५ हजार ९४९ कोटी २१ लाख रुपयांचा आणि ८ कोटी ४३ लाख रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प आज आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि शिक्षणावर यंदा विशेष भर देण्यात आला आहे. गेल्या वर्षी ३९ हजार ३८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.

यंदाचा अर्थसंकल्प आतापर्यंतचा सर्वांत मोठा अर्थसंकल्प असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात १७.७० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. विकास नियोजन खात्याकडून मिळणारे उत्पन्न दोन हजार कोटी रुपये असा अंदाजित केला होता. ते १४,७५० कोटी रुपये इतके सुधारीत करण्यात आले आहे. त्यामुळे त्यात १२,७५० कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे.

मुंबईची तुंबई नियंत्रणात आणण्यासाठी ५६५.३६ कोटींची तरतूद

दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाणी साचून पूरस्थिती निर्माण होते. अनेक भागांमध्ये हे पाणी साचतं. त्यामुळे मुंबईचं जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होतं. विशेषत: मुंबईची लोकल सेवा विस्कळीत होते. त्याचा मोठा मनस्ताप मुंबईकरांना सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मुंबईची तुंबई होण्यापासून टाळण्यासाठी पालिकेकडून करण्यात आलेल्या काही कामांची यादी यंदाच्या अर्थसंकल्पात देखील समाविष्ट करण्यात आली आहे.

यंदाच्या वर्षी पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेकडून ५६५.३६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईत पाणी तुंबण्याच्या तक्रारी आल्यास त्यावर तातडीने कार्यवाही होण्यासाठी शीघ्र प्रतिसाद वाहनांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

सखल भागातील पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी ३०५ ठिकाणी पाण्याचा उपसा करणारे पोर्टेबल उदंचन संच लावण्यात आले. तसेच, सन २०२१ मध्ये पावसाळ्यात जम्बो कोविड सेंटर, रेल्वे कल्व्हर्ट आणि इतर सखल भागात १३४ अतिरिक्त उदंचन संच लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबई शहर व मुंबई उपनगरातील संवेदनशील असलेल्या ५६ ठिकाणांजवळ असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या पातमुखांवर प्रतिबंधात्मक जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

मिठी नदी आणि वाकोला नदीमधून समुद्राच्या भरतीमुळे व पावसाच्या पाण्यामुळे होणारी पूरसदृश्य स्थिती टाळण्याकरिता कलानगर परिसरात एकूण ६ ठिकाणी ११ पूरप्रतिबंधक दरवाजे तसेच पाण्याचा उपसा करणाऱ्या १९ सबमर्सिबल उदंचन संचांची उभारणी करण्यात आली आहे.

३००० घन मी / प्रतितास क्षमतेचे १५ उदंचन संच आणि गांधी मार्केट व त्याच्या खालील बाजूला साठणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्याकरीता हिंदमाता येथे बाजुला १८००० घन मी / प्रतितास क्षमतेचे पंप उर्ध्ववाहिनी व्यवस्थेसह आणि पूरप्रतिबंधक दरवाजांसह स्थापित करण्यात आले.

अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये

 • सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करापोटी मिळणारे अंदाजित उत्पन्न हे ७,००० कोटींवरून ४,८०० कोटी रुपयांची सुधारीत तरतूद केली आहे.
 • मुंबईतील महत्वाचे आणि महत्वाकांक्षी मोठे प्रकल्प कोस्टल रोड, जीएमएलआर, एसटीपी अशा प्रकल्पांच्या भांडवली खर्चात मोठी वाढ केली आहे. मुंबईतील मलनि:सारण प्रकल्पांसाठी (एसटीपी) २०७२ कोटींची तरतूद, यापैकी सात एसटीपी प्रकल्पांसाठी १३४० कोटींची तरतूद
 • मागील वर्षीच्या तुलनेत भांडवली खर्चात ५६ टक्के वाढ करून २२.६४६.७३ कोटींचा भांडवली खर्च
 • मुंबईकरांच्या आरोग्यासाठी २०० शिवयोग केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर केंद्राच्या या योजनेचे मुंबईत नामकरण ‘शिवयोग केंद्र’ असे नामकरण करण्यात आलं आहे.
 • मुंबईत कचरा निर्माण करणाऱ्यांना वापरकर्ता शुल्क भरावं लागणार आहे. मुंबईतील ३,५०० उपहारगृहांना कचऱ्याकरता वापरकर्ता शुल्क भरावे लागणार आहे.
 • ५०० चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असलेल्या निवासी मालमत्तांना सवलत जवळपास १६,१४,००० नागरीकांना मालमत्ता करामधून १०० टक्के सवलत. प्रतिवर्षी नागरीकांना देण्यात येणाऱ्या सवलतीची रक्कम ४६२ कोटी रुपये इतकी असेल.
 • निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांसाठी नव्या ‘वापरकर्ता शुल्का’ची घोषणा, कचरा निर्मिती करणाऱ्यांना भरावे लागणार शुल्क, वर्षाकाठी वापरकर्ता शुल्कातून १७४ कोटींच्या उत्पन्नाचे लक्ष्य
 • कलाकारांसाठी दोन नव्या योजना, तरुण चित्रपट निर्मात्यांना चालना देण्यासाठी ‘युनेस्को क्रिएटीव्ह सिटी ऑफ फिल्म’, चित्रकलाकारांसाठी बस शेल्टर मोहीम
 • मुंबईकरांना खाऱ्या पाण्यातून गोडे पाणी मिळणार, मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थेवर भरीव तरतूद, खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याच्या नि:क्षारीकरणासाठी २०० कोटींची तरतूद
 • वाढत्या हवामान बदलांसाठीच्या कृती आरखड्यासाठी एक कोटींची तरतूद
 • मुंबई पूरमुक्त आणि पर्जन्य जल उदंचन ५२६ कोटींची तरतूद, ४७ पुलांच्या मोठ्या दुरुस्त्या, १४४ पुलांच्या किरकोळ दुरुस्त्यांच्या कामासाठी १,५७६.६६ कोटी नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी २०० कोटी, दहिसर पोईसर ओशिवरा आणि वालभट्ट नद्यांचे पुनरूज्जीवन, नवे रस्ते तसेच, रस्ते सुधारणांकरता २,२०० कोटींची तरतूद

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात नव्या शाळांसाठी भरीव तरतूद नाही

मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाचा यंदाचा २०२२-२३ या वर्षीचा ३३७०.२४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज पालिकेचे सहआयुक्त अजित कुमार यांनी शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोषी यांना अर्थसंकल्प सादर केला. कार्यानुभव शिक्षण आॉनलाईन, टॉय लायब्ररी, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, ई वाचनालय, डिजिटल क्लासरूम, टॅब पुरवठा, असा डिजीटल शिक्षणावर भर देणारा हा अर्थसंकल्प आहे.

मुंबई महापालिकेचे यंदाच्या वर्षीचे शिक्षण बजेट ३ हजार ३७० कोटी २४ लाख रुपयांचे आहे. अर्थसंकल्प ‘ई’ निधी संकेतांक ३० अंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज २७०१.७७ कोटी एवढे असून सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरीता महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज २८७०.२४ कोटी इतके प्रस्तावित आहे.

तसेच अर्थसंकल्प ‘ई’ निधी संकेतांक ३० अंतर्गत सन २०२१-२२ या वर्षाच्या भांडवली अर्थसंकल्पात २४४.०१ कोटीची प्रस्तावित करण्यात आलेली तरतूद सुधारित अंदाजात २७९.२८ कोटी इतकी प्रस्तावित केली आहे. तसेच सन २०२२-२३ या वर्षासाठी भांडवली कामांच्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ५००.०० कोटी एवढी अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्तावित आहे.

मुंबई महापालिकेच्या शैक्षणिक बजेटमध्ये मुंबईतील नव्या शाळांकरता भरीव तरतूद करण्यात आली नसल्याचं दिसतं. मुंबई पब्लिक स्कुलच्या शाळांची संख्या वाढवण्याची घोषणा हवेतच विरली? का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. आदित्य ठाकरेंनी प्रत्येक वॉर्डमध्ये राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय बोर्डाची शाळा सुरु करण्याचा मानस व्यक्त केला होता. मात्र, यंदाच्या बजेटमध्ये केंब्रिज आणि आय.बी बोर्डाच्या प्रत्येकी एक अश्या केवळ दोनच नव्या आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांची घोषणा करण्यात आली आहे. केवळ २ नव्या शाळांकरता १५ कोटींच्या तरतुदीव्यतिरीक्त कोणतीही भरीव तरतूद नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -