ठाणे : ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना वादाच्या भोवऱ्यात सापडली असतानाच, भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. काही राजकीय पक्षांना अनुकूल असलेली व सध्या जाहीर केलेली प्रभागरचना संपूर्णपणे रद्द करून नवी प्रभागरचना करावी, अशी मागणी भाजपाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन वसंत डावखरे यांनी सोशल मिडियाद्वारे ही माहिती दिली.
ठाणे महापालिकेच्या लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे पूर्वीच्या १३० नगरसेवकांच्या संख्येत ११ ने वाढ झाली. घोडबंदर रोड, दिवा परिसरात नगरसेवकांची संख्या वाढण्याची सर्वसाधारण अपेक्षा होती. मात्र, ठाणे शहराची केवळ १८ टक्के लोकसंख्या असलेल्या मुंब्र्यात ४, तर ८२ टक्के लोकसंख्या असलेल्या ठाण्यात ७ नगरसेवक वाढले. त्यात वागळे इस्टेट भागातील पाच वाढीव जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या दोन मंत्र्यांच्या मतदारसंघातच सहा नगरसेवक वाढले. मात्र, झपाट्याने लोकसंख्या वाढ झालेल्या घोडबंदर रोड व दिवा भागात नगरसेवकांची संख्या घटली. त्यामुळे प्रभागरचनेबाबत नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपानेही आक्रमक भूमिका घेऊन प्रभागरचनेला विरोध केला आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी झालेली प्रभाग रचना ही केवळ सत्ताधाऱ्यांना लाभ व्हावा, यादृष्टीने हेतुपुरस्सर पद्धतीने करण्यात आली. त्यात सत्ताधाऱ्यांकडून स्पष्टपणे हस्तक्षेप झाला असल्याचा भाजपाचा आरोप आहे. लोकसंख्येच्या आधारावर वा भौगोलिक दृष्टीकोनाने प्रभाग रचना केली जाते. मात्र, काही राजकीय पक्षांना फायदा व्हावा, त्यांच्या नगरसेवकांच्या संख्येत वाढ व्हावी, हा उद्देश ठेवण्यात आला होता. त्यामुळे या प्रभागरचनेला भाजपाचा आक्षेप आहे. राज्य निवडणूक आयोगाने लोकहित व लोकन्यायासाठी हस्तक्षेप करून प्रभाग रचना सुरळीत करावी, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.