नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी २०२२च्या अर्थसंकल्पावर भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या गोष्टी यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी लोकसभेत देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. देश १०० वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीशी लढत आहे. कोरोनाच्या या काळात जगासमोर अनेक आव्हाने आली आहेत. आपण पुढे जे जग पाहणार आहोत ते कोरोनापूर्वीचे जग राहणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
“कोरोनानंतर नवी जागतिक व्यवस्था तयार होईल. याची चिन्हेही दिसू लागली आहेत. आज भारताकडे पाहण्याच्या जगाच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. आता जगभरातील लोकांना भारताला अधिक मजबूत रूपात पहायचे आहे, त्यामुळे जेव्हा संपूर्ण जग भारताकडे नव्याने पाहत आहे, तेव्हा आपणही देशाला अधिक वेगाने पुढे नेणे आवश्यक आहे. नवीन संधी आणि नवीन संकल्प पूर्ण करण्याची ही वेळ आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
मोदींनी कार्यकर्त्यांना सांगितले की, “हीच नवीन संधींची वेळ आहे, नवीन संकल्प पूर्ण करण्याची हीच वेळ आहे. भारत स्वावलंबी झाला पाहिजे आणि आत्मनिर्भर भारताच्या पायावर आधुनिक भारताची उभारणी झाली पाहिजे. २०१३-१४ मध्ये भारताची निर्यात २ लाख ८५ हजार कोटी रुपयांची होती. आज भारताची निर्यात ४ लाख ७० हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे.”
आता जवळपास नऊ कोटी ग्रामीण घरांमध्ये नळांचे पाणी पोहोचू लागले आहे. यापैकी गेल्या दोन वर्षांत जलजीवन अभियानांतर्गत पाच कोटींहून अधिक नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. यावर्षी सुमारे चार कोटी ग्रामीण कुटुंबांना नळजोडणी देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
“गेल्या सात वर्षात आपल्या सरकारने तीन कोटी गरीबांना पक्की घरे देऊन लखपती बनवले आहे. जे गरीब होते ते झोपडपट्टीत राहत होते, आता त्यांच्याकडे स्वतःचे घर आहे. या घरांसाठीची रक्कमही पूर्वीच्या तुलनेत वाढली असून मुलांना अभ्यासासाठी जागा मिळावी म्हणून घरांचा आकारही वाढला आहे. मोठी गोष्ट म्हणजे यातील बहुतांश घरे महिलांच्या नावावर आहेत,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींपूर्वी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कार्यक्रमाला संबोधित केले. “आम्हाला पंतप्रधानांकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आले आहे. येत्या २५ वर्षात नव्या भारताचा पाया रचण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेले अमृत काल, देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेईल,” असे नड्डा म्हणाले.