Tuesday, March 18, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेसमीर वानखेडेंच्या वाशी येथील सदगुरु बारचा परवाना रद्द

समीर वानखेडेंच्या वाशी येथील सदगुरु बारचा परवाना रद्द

नवाब मलिकांच्या तक्रारीनंतर जिल्ह्याधिकाऱ्यांचा वानखेडेंना दणका

मुंबई : नवी मुंबईतील वाशी येथील समीर वानखेडेंच्या मालकीच्या सदगुरु हॉटेल, बार आणि रेस्तराँचा परवाना ठाण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी रद्द केला आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यातील वादानंतर आता ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी वानखेडेंना दणका दिला आहे. विशेष म्हणजे नवाब मलिक यांनी यासंदर्भात तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे.

सदगुरु हॉटेल आणि बार या हॉटेलचे मालक समीर वानखेडे आहेत. १९९७ साली परवाना काढताना वानखेडे यांनी आपले वय चुकीचे दाखवल्याचा ठपका ठेवत हा परवाना रद्द करण्यात आला आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार वाशीमधील सदगुरु हॉटेलचा परवाना वानखेडे यांच्या नावे होता. हा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ रोजी जारी करण्यात आला आहे. तसेच मध्यंतरी हा परवाना रिन्यू करण्यात आला होता. आता परवाना रद्द केला असला तरी तो ३१ मार्च २०२२ पर्यंतच पात्र होता. म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिने आधीच परवाना रद्द केला असून आता या कारवाईमुळे परवाना रिन्यू करता येणार नाही. या बारमध्ये परदेशी तसेच भारतीय बनावटीच्या दारुची विक्री करण्यास परवानगी देण्यासंदर्भातील हा परवाना होता.

“समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र आहे,” अशा कॅप्शनसहीत नवाब मलिक यांनी एक फोटो शेअर केला होता.

मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर वानखेडेंनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं. वानखेडे यांनी आपण भारतीय महसूल सेवेमध्ये (आयआरएस) रुजू झाल्यापासून हा परवाना आपल्या नावे असल्याचं स्पष्ट केलं होतं. या परवान्यासंदर्भातील कायदेशीर हक्क हे समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे देण्यात आले आहेत. “यात बेकायदेशीर असं काहीच नाही. मी सेवेमध्ये रुजू झालोय तेव्हापासून म्हणजेच २००६ सालापासून या बार आणि रेस्तराँरंटचा उल्लेख माझ्या वार्षीक स्थावर मालमत्तेमध्ये करत आहे. तसेच या परवान्याबद्दलचाही उल्लेख मी संपत्तीच्या हिशोबात मांडला आहे. या उद्योगामधून मिळणाऱ्या कामाईचा सर्व उल्लेख मी प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये केला आहे,” असे वानखेडे म्हणाले होते. मात्र आता वयाच्या मुद्द्यावरुन हा परवाना रद्द करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -