मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोरेगावमधील एका भूखंडाच्या फसव्या एफएसआय (फ्लोअर स्पेस इंडेक्स) विक्रीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद केल्यानंतर बुधवारी पहाटे प्रवीण राऊत यांना एक हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अटक केली आहे.
प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असून एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत. यापूर्वी डिसेंबर २०२० मध्ये पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात प्रवीण यांचे नाव समोर आले होते. प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी २०१० मध्ये खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ५५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचे यंत्रणेच्या तपासात समोर आले होते. ज्याचा वापर मुंबईतील दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला गेला होता.
एचडीआयएलमधील एक हजार ३४ कोटींचा घोटाळा समोर आल्यानंतर आता प्रविण राऊत यांना अटक करण्यात आली आहे. प्रविण राऊत यांच्या पत्नीच्या खात्यामधून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात आले होते आणि याचे पुरावे ईडीला मिळाले होते. त्यामुळे ईडीकडून याप्रकरणी तपास सुरु आहे.