Saturday, April 19, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यलग्न जमविण्याआधी इतके नक्कीच करा!

लग्न जमविण्याआधी इतके नक्कीच करा!

मीनाक्षी जगदाळे

लग्न! प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा, संस्मरणीय विषय आणि तितकाच कसोटीचा निर्णय. लग्न ठरवून केलेले असो वा प्रेमविवाह असो. इंटरनेटवर ठरलेले लग्न असो वा मध्यस्थामार्फत ठरलेले. वधू-वर सूचक केंद्रामार्फत जुळलेले असो. लग्नानंतर अनेकदा समोर अनपेक्षित परिस्थिती येते, अनाकलनीय घटनांना सामोरे जावे लागते, लग्न करताना स्वप्नवत वाटणारे जग अचानक बदलते, संबंधित माणसे बदलतात, अथवा जे आपल्याला लग्नाआधी, लग्न ठरवताना सांगितले जाते, साखरपुडा, सुपारी झाल्यावर दाखवले जाते, त्यामध्ये प्रचंड तफावत असल्याचे प्रत्यक्ष लग्न झाल्यानंतर लक्षात येते.

लग्न ठरताना मुलाकडील असो वा मुलीकडील मंडळी असोत, अतिशय ठरावीक आणि वरवरच्या गोष्टी पाहून निर्णय घेताना दिसतात. सर्वसाधारणपणे मुला-मुलींची एकमेकांना रंग-रूपाबाबत, आवडी-निवडी बाबतीत पसंती, शिक्षण, नोकरी अथवा व्यावसायिक माहिती, आर्थिक परिस्थिती, स्थावर, जंगम मालमत्ता, नातेसंबंध, पत्रिका जुळविणे, देणे-घेणे यावर चर्चा करून लग्न ठरवले जाते. लग्नानंतर काही अनुचित घडू नये म्हणून समोरील स्थळाची चौकशी केली तरी ती नातेवाईक, ओळखीचे अथवा मित्र मंडळींमार्फत केली जाते. त्यांना देखील सदर कुटुंबातील आतील सर्व सत्य परिस्थितीची इत्यंभूत माहिती असेलच. असे नसते किंवा जरी माहिती असेल तरी आपण कशाला वाईटपणा घ्यायचा आणि होऊ घातलेले लग्न मोडायचे म्हणून कोणीही सहसा या भानगडीत पडत नाही. मुलाकडील अथवा मुलीकडील लोक कोणाहीमार्फत स्थळाची चौकशी करताना थोडे घाबरतातच. जर समोरील लोकांच्या लक्षात आलं तर संबंध खराब होतील, होऊ घातलेले लग्न मोडेल, चांगलं स्थळ हातचे जाईल ही धाकधूक त्यांच्या मनात असते.

लग्नाआधी सर्व अलबेल वाटत असते, सर्व काही राजीखुशीने झालेले असते, बोलाचाली झालेली असते, भेटीगाठी झालेल्या असतात. तरीही लग्नानंतर वादविवाद होणे, वैवाहिक समस्या विकोपाला जाणे, फारकतीचे प्रमाण वाढणे, विवाहितांच्या आत्महत्या होणे अशा घटना का घडताना दिसतात? यावर विचार केला, तर बहुतांश वेळी हेच लक्षात येते की, लग्नाआधी जे काही एकमेकांना दाखवले गेले, सांगितले गेले, मोठेपणा केला गेला, बढाया मारल्या गेल्या, बडेजाव केला गेला तो पोकळ होता. जे सत्य लग्नाआधी लपवले गेले ते लग्नानंतर समजले आणि संसारात विस्फोट झाला. अनेक धक्कादायक माहिती समोर आली आणि ती पचवणे आणि संसार पुढे नेणे शक्य नाही हे लक्षात आले. अशी परिस्थिती उद्भवल्यास विभक्त होणे, पोलीस स्टेशन, कोर्ट-कचेरीशिवाय आता पर्याय राहिलेला नाही, या निष्कर्षावर दोन्हींकडील मंडळी आलेली असतात.

समुपदेशनला आलेल्या अनेक प्रकरणांमधून शक्यतो ही माहिती मिळते की, लग्नाआधी मुलाकडून अथवा मुलीकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे संसार तुटायला आलेला आहे.

एकमेकांना त्यांच्या खऱ्या शैक्षणिक पात्रतेबद्दल, कायमस्वरूपी नोकरी असण्याबद्दल, व्यावसायिक स्तिथी आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पनाबद्दल, राहते घर, इतर मालमत्ता याबद्दल जी काही माहिती देण्यात आली ती नंतर पूर्णतः चुकीची अथवा खोटी असल्याचे लक्षात आले. मुलगा अथवा मुलगी यांचे लग्नाआधीचे प्रेमप्रकरण, चुकीच्या मित्र- मैत्रिणींची संगत लग्नानंतर समजली आणि त्याचा त्रास होऊ लागला. मुलाच्या बाबतीत त्याचे व्यसन, त्याला असलेल्या वाईट सवयी, नंतर लक्षात आल्या आणि त्यासोबत तडजोड करून राहणे अशक्य आहे. मुलाचे उत्पन्न लग्नाआधी जसे दाखवले अथवा सांगितले गेले त्यात खूप तफावत आढळली. लग्नानंतर समजले की, सांगण्यात आले त्यानुसार बँक खाते, त्यातील सेव्हिंग, बँक बॅलन्स नसून तो तसेच संपूर्ण कुटुंब खूप कर्जबाजारी असल्याचे लक्षात आले आणि आता माहेरवरून पैसे आणण्यासाठी त्रास देणे सुरू आहे. मुलाची स्वतःची दुचाकी, चारचाकी गाडी, स्वतःच्या नावावर फ्लॅट असल्याचे दाखवले होते. पण नंतर समजले की, हे सर्व खोटे होते, दिखावा होता. याव्यतिरिक्त आम्ही फ्लॅट बुक केला आहे, ताबा नंतर मिळणार आहे, चांगली नोकरी लागली आहे किंवा लागणार आहे, काही दिवसांनी जॉईन होणार आहे, काही दिवसांत परदेशी जाणार आहे, मुलीला पण परदेशी नेणार आहे, परदेशात मुलगा कायमस्वरूपी नोकरीत आहे, असे सांगितले होते. पण हे खोटं निघालं. परदेशातील त्याची नोकरी टेम्पररी किंवा खालच्या दर्जाची आहे हे नंतर लक्षात आले. लग्नानंतर मुलगा, मुलगी दोघेही एकत्र एखाद्या शहरात नोकरीनिमित्ताने राहणार आहेत, असे सांगितले होते, मुलीला नौकरी करू देणार सांगितले होते. पण लग्नानंतर मुलीला सासू-सासऱ्यांजवळ ठेवले, गावी ठेवले, नवरा एकटा शहरात किंवा परदेशात गेला, यांसारख्या असंख्य समस्या लग्नानंतर उद्भवतात.

मुलगा-मुलगी दोघांनाही आरोग्याच्या गंभीर काही समस्या असू शकतात, ज्या लग्नाआधी झाकून ठेवल्या जातात आणि नंतर लक्षात आल्यावर त्यातून वादंग निर्माण होतात. कुटुंबातील लोकांची देखील खरी माहिती, परिस्थिती अनेकदा लपविली जाते आणि नंतर त्याचे रूपांतर त्रासात झाल्यावर लग्न मोडकळीस येऊ लागते. अनेक मोठमोठ्या घरातील, सुशिक्षित घरातील, स्वतःला सुसंस्कृत म्हणवणारी कुटुंबं अशा प्रकारे राजरोसपणे समाजात स्वतःबद्दल खोटी प्रतिमा तयार करून ताठमानेने राहत आहेत. चांगल्या घरांतील मुलांवर पोलिसात तक्रारी दाखल असल्याचे, कोर्टात विविध केसेस सुरू असल्याचे देखील लग्नानंतर लक्षात येते आहे आणि लग्नाआधी दाखवला तो सगळा दिखावा होता, भ्रम होता हे नंतर समजल्यावर फक्त पश्चाताप करणे याशिवाय मुलीला आणि तिच्या घरच्यांना पर्याय राहत नाही.

समुपदेशनामधून जेव्हा अशी अनेक प्रकरणं समोर आली तेव्हा इच्छुक वधू अथवा वर यांना तसेच त्यांच्या घरच्यांना एकच सांगावेसे वाटते की, कोणतेही स्थळ आले, ते वरवर गडगंज श्रीमंत वाटले म्हणून लगेच हुरळून जाऊ नका. मुलगा खूप उच्चशिक्षित आहे, परदेशात आहे म्हणून लगेच घाईने लग्न उरकण्याचा निर्णय घेऊ नका. मुलाचे अथवा मुलीचे या आधीसुद्धा लग्न झालेले आहे, का इथपासून तो ज्या घरात राहतो ते भाड्याचे आहे की, स्वतःच्या मालकीचे आहे, हे सारं जाणून घ्या, तो तुमचा हक्क आहे.

लाखो रुपये खर्च करून, मुला-मुलींचे आयुष्य पणाला लावून, आयुष्यभराची कमाई विवाह कार्यात उधळून पण नंतर वादविवाद, भांडणं, घटस्फोट, आत्महत्या यांसारख्या प्रसंगांना सामोरे जावे लागणार असेल आणि आयुष्य बरबाद होऊन कमावलेली प्रतिष्ठा धुळीला मिळणार असेल, तर अशा लग्नाचा उपयोग काय? लाखोंची खरेदी करताना, मंगल कार्यालय, कॅटरिंग सेवा बुक करताना व एक दिवसाचा मोठेपणा करून भविष्यात पश्चाताप करत बसण्यापेक्षा विवाहाेच्छुकांनी विचार करणे गरजेचे आहे. लग्नाआधी चौकशी करण्यावर भर द्या. विश्वासू व्यक्ती, नातेवाईक याप्रमाणेच अनेक खासगी सेवा देणाऱ्या डिटेक्टिव्ह एजन्सी आहेत, ज्यामार्फत लग्नाआधी संबंधित स्थळाबाबत चौकशी करून सर्व माहिती मिळवू शकतो याला देखील प्राधान्य द्या.

अशा माहिती शोधून देणाऱ्या डिटेक्टिव्ह एजन्सीच्या सेवांचा लाभ घेऊन आपण आपल्या मुला-मुलीचे लग्न निदान चुकीच्या ठिकाणी, खोट्या आणि फसवणाऱ्या घराण्यात लावणार नाही, इतकी शाश्वती जरूर मिळवता येते. स्वतःबद्दलची जी माहिती संबंधित स्थळाने दाखवली अथवा सांगितली आहे, तिची पूर्ण पडताळणी केली जाऊन त्याचा पूर्ण अहवाल आपल्याला मिळतो, जेणेकरून लग्नाबद्दलचा कोणताही निर्णय घेणे आपल्याला सोपे जाते. लग्नाचा प्रचंड खर्च करण्याआधी या सेवांचा लाभ घेणे, काळाची गरज आहे. सत्य माहिती जर पुराव्यानिशी लग्नाआधी कळली, तर मुला-मुलींच्या आयुष्याचे होणारे नुकसान थांबवता येऊ शकते. अशा एजन्सी संबंधित स्थळाची सर्व खरी माहिती पुराव्यानिशी देऊन, आपले नाव गोपनीय ठेवून आपल्याला अचूक निर्णय घ्यायला मदत करतात.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -