Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबईत भाजप-काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने

मुंबईत भाजप-काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने

मंगलप्रभात लोढा व झिशान सिद्दीकी अटकेत

मुंबई : पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सुरु असलेल्या हेरगिरीच्या निषेधार्थ मुंबईच्या दादर परिसरातील भाजपच्या वसंत स्मृती या कार्यालयावर काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे बुधवारी दादर परिसरात भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. दादरच्या स्वामीनारायण मंदिराच्या परिसरात साधारण तासभर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसमाने आल्याने तणाव निर्माण झाला होता.

काँग्रेसचे नेते झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्त्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा वसंत स्मृतीच्या दिशेने येत असल्याचे कळताच भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचे कार्यकर्ते याठिकाणी एकटवले. मात्र, पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वसंत स्मृतीपासून काही अंतरावर रोखले. पोलिसांनी काहीवेळापूर्वीच आमदार झिशान सिद्दिकी आणि मंगलप्रभात लोढा यांना ताब्यात घेतले आहे. मात्र, अजूनही या परिसरात तणाव आहे.

पोलिसांनी मंगलप्रभात लोढा यांना ताब्यात घेतल्यानंतरही भाजपचे कार्यकर्ते याठिकाणाहून हटायला तयार नाहीत. भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये यावेळी बाचाबाचीही झाली. सध्या पोलिसांकडून भाजप कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. पोलिसांनी फक्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यावे. भाजपच्या कार्यकर्त्यांना अटक करु नये, असे भाजप नेते प्रसाद लाड यांनी म्हटले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यालयावर हल्ला केल्यास आम्ही त्यांना प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहोत, असेही प्रसाद लाड यांनी म्हटले.

दादरच्या वसंत स्मृती कार्यालयावर मोर्चा काढण्यासंदर्भात कालपासून मेसेज फिरत आहेत. तरीही पोलिसांनी काही केले नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते याठिकाणी येईपर्यंत पोलीस झोपले होते का? परंतु भाजपचे कार्यकर्ते दाऊदच्या औलादी आणि टिपू सुलतानाच्या समर्थकांना वसंत स्मृतीपासूनच्या १०० मीटरच्या परिसरातही फिरकून देणार नाहीत, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले. काँग्रेसचे कार्यकर्ते माघार घेत नाही तोपर्यंत भाजपही येथून मागे हटणार नाही, असे सांगत मंगलप्रभात लोढा याठिकाणी ठिय्या मांडून बसले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आम्ही काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचे म्हटले. भाजपचे कार्यकर्ते बौद्धिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या अशा प्रकारांना सामोरं जाण्यास तयार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी सांगितले की, प्रत्येक नागरिकांची हेरगिरी केली जात असून फोन टॅपिंग सुरू आहे. पत्रकार, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांची हेरगिरी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याच देशात नागरीक सुरक्षित नसल्याचे म्हटले.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दादरमध्ये जमण्याची अधिकृत परवानगी मागितली होती. त्यांना तशी परवानगी दिलीही होती. पण त्यावेळी काँग्रेसकडून आमच्या पक्षाचा काहीतरी कार्यक्रम आहे, असे सांगण्यात आले होते. परंतु, आज सकाळी काँग्रेस कार्यकर्ते याठिकाणी जमल्यानंतर त्यांनी थेट भाजपच्या कार्यालयाच्या दिशेने कूच केल्याचे पोलिसांनी म्हटले. भाजप आमदार प्रसाद लाड आणि मंगल प्रभात लोढा यांच्यासह भाजप कार्यकर्ते मुंबईतील कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन ऐकण्यासाठी जमले होते. काँग्रेस कार्यकर्ते कार्यालयाच्या दिशेने आंदोलन करण्यासाठी येत असल्याच समजताच भाजप नेते आणि कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दिशेने चालले होते. पोलिसांनी रस्त्यावर उतरुन भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखण्यात यश मिळवले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -