अँटिगा (वृत्तसंस्था) : आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या म्हणजे २०२२च्या मेगा लिलावामध्ये ५९० क्रिकेटपटूंना बोली लागणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ही माहिती दिली. आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी २०२२ रोजी बंगळुरू येथे होणार आहे, ज्यामध्ये दहा संघांचे मालक आणि प्रतिनिधी सहभागी होतील.
दोन दिवसीय मेगा लिलावासाठी खेळाडूंची अंतिम यादी सादर करण्यात आली आहे. यासाठी १२००हून अधिक क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती, मात्र ५९० क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. या खेळाडूंपैकी २२८ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले (कॅप्ड) आणि ३५५ नवोदित (अनकॅप्ड) आहेत. कॅप्ड म्हणजे ते भारतासाठी किंवा इतर कोणत्याही देशासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. त्याच वेळी, अनकॅप्ड खेळाडूंचा अर्थ असा, की त्यांनी भारत किंवा इतर कोणत्याही देशांतर्गत क्रिकेट किंवा लीग क्रिकेट खेळले आहे, परंतु त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. या मेगा लिलावात असोसिएट नेशन्सचे सात क्रिकेटपटू नशीब अजमावणार आहेत.
भारताच्या प्रमुख खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर, शिखर धवन, आर अश्विन, मोहम्मद शमी, इशान किशन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, इशांत शर्मा, उमेश यादव आणि हर्षल पटेल यांच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. परदेशी क्रिकेटपटूंमध्ये फाफ डु प्लेसिस, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, कॅगिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक, जॉनी बेअरस्टो, जेसन होल्डर, ड्वेन ब्राव्हो, शाकीब अल हसन आणि वानिंदू हसरंगा या खेळाडूंचा समावेश आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये दहा फ्रँचायझी संघ सहभागी होणार आहेत. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ गेल्या काही हंगामांपासून आयपीएल खेळत आहेत, पण आता लखनऊ सुपरजायंट्स आणि अहमदाबादचा संघ आयपीएल खेळणार आहे.
आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात आता ४८ क्रिकेटपटू असे आहेत, ज्यांची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. तर मूळ किंमत १.५ कोटी असलेल्यांची संख्या २० आहे. १ कोटी मूळ किंमतीसाठी ३४ खेळाडू उपलब्ध असणार आहेत. यश धुल, विकी ओसवाल, राजवर्धन हंगर्गेकर हे १९ वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये खेळत असलेले युवा क्रिकेटपटूही मेगा लिलावाचा भाग असतील.