शिबानी जोशी – सेवाव्रती
राजस्थानमधील राजकुवर नावाची मुलगी सती गेली होती. ही घटना साधारण १९८७ सालात घडली होती. या काळातही अशा प्रकारच्या रूढी समाजात आहेत, हे लक्षात येऊन समाजमन अस्वस्थ झालेलं होतं. याशिवाय त्याच काळात मंजुश्री सारडाचा सासरी छळ होऊन हुंड्यासाठी बळी गेल्याची घटनाही घडली होती. कामाच्या ठिकाणी हरासमेंटसारख्या घटनाही घडत होत्या. असं सर्व वातावरण असताना मुंबईत निर्मलाताई आपटे आणि त्यांच्या समविचारी पाच-सहा मैत्रिणी अस्वस्थ झाल्या. महिलांसाठी काहीतरी कार्य सुरू करावं, असं त्यांना प्रकर्षानं वाटलं आणि त्यातूनच १५ मे १९८८ साली भारतीय स्त्रीशक्ती या संघटनेची स्थापना झाली.
१५ मे हा जागतिक कुटुंब दिन आहे. कुटुंब हा समाजाचा पाया असून कुटुंबामध्ये स्त्रीचं स्थान घरातल्या सर्वांप्रमाणे समान हवं. प्रत्येकाला विकासाची समान संधी मिळाली पाहिजे, तरच कुटुंब निरोगी होईल आणि त्यामुळे समाज निरोगी होईल हे संस्थेचे मूळ सूत्र आहे. निर्मलाताई या मूळच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यां, समाजकारणाचं मूळ त्यांच्यात रुजलं होतच. महिलांना त्यांच्या प्रश्नावर जागृत करण्यासाठी निर्मलाताई आणि त्यांच्या पाच-सहा सहकारी मैत्रिणी तळमळीनं एकत्र आल्या आणि मग सर्वात प्रथम वरळीमधल्या महापालिकेच्या शाळेत मुलींसाठी, मुलगी वयात येताना, पाळीच्या काळात पाळायचं, आरोग्य वगैरे अशा विषयांवर छोटे-छोटे सेशन घ्यायला सुरुवात केली. पाळी शारीरिक घडामोड आहे. रूढी, अंधश्रद्धा कशाला? असं मुलींना सांगितल्यावर त्या म्हणाल्या की, हे सगळं तुम्ही आमच्या आईंना पण का सांगत नाही? यातून मग लक्षात आलं की, सर्व वयोगटातील महिलांसाठी काही तरी करायची गरज आहे आणि म्हणून महिलांना एकत्र येण्याचं काम सुरू झालं. मुंबईत हे काम सुरू झालं, पण नंतर पुणे, नागपूर, लातूर, सांगोला असं ते पसरत गेलं त्यानंतर देशातल्या विविध प्रांतातही भारतीय स्त्री शक्तीच्या अनेक शाखा झाल्या. केरळ, जम्मू, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, गोवा अशा ठिकाणी हे काम पसरत गेलं. सुरुवातीला किशोरी विकास प्रकल्प सुरू करण्यात आला. महिलांच्या रोजगार संबंधीची एक परिषद घेण्यात आली. पुण्यात त्यानंतर एक चेतना परिषद भरवली गेली. आणि मग आता दर तीन वर्षांनी अशा प्रकारची परिषद आयोजित केली जाते. मुंबईत चेंबूरला, १९९२ साली डोंबिवलीला अशी परीषद झाली. या प्रत्येक परिषदेमध्ये महिलांच्या विविध प्रश्नांवर प्रस्ताव तयार केले गेले, हे प्रस्ताव शासनाकडे पाठवले जातात. महिलांचे बचत गट ही सुरू केले गेले, यातून अनेक महिला जोडल्या गेल्या. नुसता बचत गट करून संघटना थांबली नाही, तर त्यांच्या प्रत्येक मासिक मिटींगला एक कार्यक्रम जोडला गेला म्हणजे योगासनं किंवा तुमची स्वतःची सगळी कागदपत्र, ओळखपत्र तुमच्याकडे आहेत का? याविषयीची माहिती देण्यात आली. या बचत गटांच्या उत्पादनांसाठी बाजारही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. सुशिक्षित महिलांनी संघटनेशी जोडले जाण्यासाठी वाचक मंच सुरू केले गेले. याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबई, पुणे, सांगोला, नागपूर, नाशिकला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. महिलांविषयक लिखाण, महिलांवरची पुस्तके, सामाजिक कार्याची पुस्तके याचं एकत्र येऊन वाचन करायचं, त्यावर चर्चा करायची, अशी ही योजना होती. याला खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याचं बघून नंतर एक प्रांत स्तरावरच वाचक संमेलनही घेण्यात आले. यात सगळीकडच्या या महिला एकत्र आल्या.
आजही पुणे आणि नागपूर येथे दरवर्षी असं वाचक संमेलन भरतं. ‘कळी उमलताना’ नावाची एक छोटी पुस्तिका तयार केली गेली. यातून जवळ लाख, दीड लाख मुलींशी संघटनेनं संपर्क साधला. वयात येताना शारीरिक, मानसिक वाढ, स्वच्छता कशी राखायची? याची माहिती दिली गेली. ‘फंड हर एज्युकेशन’ हा एक उपक्रम सुरू केला आहे. समाजात अनेकांना चांगल्या कामासाठी सत्पात्री देणगी द्यायची असते, अशांकडून एका मुलीच्या शिक्षणाचा खर्च असा हा उपक्रम होता आणि त्यात मुलींना फी पैसे न देता, थेट भरली जाते.
भारतीय स्त्री शक्ती या संघटनेने सुरुवातीपासूनच एक पंचसूत्री अवलंबली आहे. शिक्षण, आरोग्य, समानता, आत्मसन्मान आणि आर्थिक निर्भरता, या पाच गोष्टींवर भर दिला जातो. एखाद्या महिलेचं सबलीकरण करायचं असेल, तर या पाच गोष्टी तिच्याकडे असायला हव्यात, असं मानून शिक्षणासाठी किशोरी विकास प्रकल्प, ‘फंड हर एज्युकेशन’ हे प्रकल्प राबवले जात आहेत. आरोग्यासाठी मुलगी वयात येताना, कळी उमलताना पुस्तिका काढल्यात. फक्त मुली नाही, तर मुलंही जागृत झाली पाहिजेत म्हणून मुलांसाठी ‘कुतूहल’ नावाची पुस्तिका संघटनेने काढली. आर्थिक निर्भरतासाठी महिला बचत गट स्थापन केले. अनेक विषयांवर संघटनेतर्फे अनेक पुस्तिका प्रकाशित करून विविध विषयांवर प्रबोधन केले जाते.
भारतीय स्त्री शक्ती पॉलिसी मेकिंगमध्ये सुद्धा काम करत असते. उदाहरणार्थ सरोगसी हा विषय जेव्हा खूपच चर्चिला जात होता, त्या काळात गुजरातमध्ये, जिथे सरोगसीचं प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी जाऊन एक अभ्यास केला गेला. अभ्यास गटाने तिथे येणाऱ्या महिला, एजंट, लॅब कर्मचारी अशा अनेकांच्या मुलाखती घेतल्या. ज्या महिला बाळाला जन्म देण्यास सक्षम नाहीत, अशानेच परस्पर सामंजस्यातून सरोगसी करावी मात्र कमर्शियल सरोगसीवर पूर्णपणे बंदी घालावी, त्याचा व्यापार किंवा धंदा होऊ नये. असा निष्कर्ष काढला गेला. त्यावर नागपूरला एक सेमिनार घेऊन याचा महिलांवर आर्थिक, सामाजिक, मानसिक काय परिणाम होतो यावर चर्चा झाली आणि सरोगसीवर कमर्शियल बँन आणावा, असा विचार संघटनेने मांडून तशा शिफारसी सरकारकडे केल्या. महिला सुरक्षा प्रश्न अगदी प्रश्न ऐरणीवर आला होता तेव्हा संघटनेने असं एक मत मांडलं की, प्रशासनाने किंवा तिथल्या सामाजिक संघटनांनी आपापल्या भागाच सेफ्टी ऑडिट करावं. आपल्या भागात कुठला भाग अंधारा आहे, कुठे रोड रोमिओंचं टोळकं बसलेलं असतं, अशा ठिकाणी दिवे लावणं, सुरक्षा उपाय, अशा शिफारसी संगटनेने केल्या आहेत.
भारतीय स्त्रीशक्ती मुख्यत: किशोरी विकास प्रकल्प महिलांचे बचत गट त्यांच्यासाठी कौन्सिलिंग सेंटर आणि वाचक मंच हे उपक्रम नित्याने राबवत आहे. त्याशिवाय अभ्यास गट स्थापन करून महिलांच्या प्रश्नावर शिफारसी सुचवणे व इतर विविध कार्यक्रमही करते, त्याची माहिती आपण पुढच्या भागात घेऊ या.