नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे.
गेल्या वर्षी निर्मला सीतारामन यांनी टॅबच्या सहाय्याने अर्थसंकल्प मांडला होता. आज अर्थमंत्री पेपरविना (पेपरलेस) डिजिटल अर्थसंकल्प मांडत आहेत.
डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणार
२०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन सांगितले की, डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. देशाचा विकास दर ९.२७ टक्के असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान आवास योजनेसाठी ४८ हजार कोटींची नव्याने तरतूद
शहरी आणि ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेसाठी ४८ हजार कोटींची नव्याने तरतूद करण्यात आली आहे. मध्यमवर्गीय आणि गरिबांना परवडणारी घरं मिळावीत यासाठी खासगी बिल्डरांशी चर्चा करणार असून मध्यस्थांमुळे वाढणारा खर्च कमी करण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ८० लाख घरं बांधणार आहोत.
पुढील पाच वर्षात ६० लाख नवे रोजगार निर्मिती केली जाणार
पुढील पाच वर्षात ६० लाख नवे रोजगार निर्मिती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात मेट्रो ट्रेनचं जाळं उभं करण्यासाठी प्रोत्साहन देणार
देशात २५ हजार किमीचं रस्त्याचं जाळं उभं करणार. तसंच मेट्रो ट्रेनचं जाळं उभं करण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. तसंच पुढच्या तीन वर्षात ४०० वंदे भारत रेल्वे सुरु होणार असून रेल्वेचं जाळं विकसित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे
यावर्षी सरकारकडून मोठ्या प्रमाणात धान्याची खरेदी झाली असून थेट रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. यातील काही रक्कम आधीच जमा करण्यात आली असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.
कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात नैसर्गिक शेती, झिरो बजेट शेतीचा समावेश
नाबार्डकडून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासह आयटी बेस सपोर्ट कसा मिळेल यासाठी प्रयत्न सुरु आहे. जलसिंचन वाढवण्याचा प्रयत्न, सौर उर्जेचा वापर, पेयजलासाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोदावरी कृष्णा, कृष्णा पेन्नार, पेन्नार कावेरी नद्यांसाठी योजना राबवण्यात येईल अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.
वर्षभरात २५ हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग बांधणार!
नवी दिल्ली : अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या इतर अनेक घोषणांसोबत देशात पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यासाठी लक्ष्य ठरवण्यात आले असून देशात तब्बल २५ हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग उभे करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
पंतप्रधान गती शक्ती योजना
देशाच्या अर्थव्यवस्थेला चालणा देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान गतीशक्ती योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत देशातील राष्ट्रीय महामार्गांचं जाळं २५ हजार किलोमीटरने वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुढील वर्षभरात अर्थात २०२२-२३ साठी हे लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे.
अर्थसंकल्पात सौरऊर्जा निर्मितीसाठी १९ हजार ५०० कोटींची तरतूद करण्यात आली असून देशात इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन चार्जिंग स्टेशन्स बसवण्यात येणार आहेत. देशात सौरऊर्जेसाठी सौर पॅनेल आधारित ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यावर भर दिला जाईल, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.