Friday, May 9, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

विद्यार्थ्यांनो चर्चा करा, आंदोलन हे शेवटचे पाऊल - वर्षा गायकवाड

विद्यार्थ्यांनो चर्चा करा, आंदोलन हे शेवटचे पाऊल - वर्षा गायकवाड

मुंबई : “सध्या मी धारावीला राहत नाही. मी मंत्रालयाजवळच्या बंगल्यात वास्तव्याला आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करावी ही मागणी आहे. मागच्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. विद्यार्थ्यांनी मोर्चे काढू नये, चर्चा करुन निर्णय घेऊ” असे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आवाहन केले आहे.


दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षांना विरोध करण्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले होते. यामध्ये काही वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या घटनेवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असतील तर त्यांनी चर्चा करावी, आंदोलन हे शेवटचे पाऊल असते, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी शिक्षण मंत्र्यांच्या धारावी येथील घराबाहेर मोठी गर्दी केली होती.


वर्षा गायकवाड म्हणाल्या, "एकतर चर्चेतून प्रश्न सुटतात पण अशा प्रकारे विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून एखाद्या गोष्टीला हिंसक वळण देणं किंवा विद्यार्थ्यांना अशा प्रकारे प्रेरित करणं हे चुकीचं आहे. आंदोलन करणारी ही मुलं अठरा वर्षांखालील अल्पवयीन आहेत. त्यामुळं त्यांना भडकवताना प्रत्येकानं या गोष्टींचा विचार करावा. मी शिक्षणतज्ज्ञ, पालक आणि विद्यार्थी या सर्वांना आवाहन करीन की, आपल्या सर्वांचं ध्येय एक आहे. आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेत आहोत. गेल्या दोन वर्षात जी पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरुन त्याचं पुढचं शिक्षण सुरळीत सुरु व्हावं यासाठी आमचा प्रयत्न आहे. चर्चेअंती कुठलेही प्रश्न सुटू शकतात. त्यामुळं आंदोलन हे केवळ शेवटचं पाऊल असू शकतं. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की, मुलं अभ्यास करत आहेत. त्यामुळं त्यांच्या भविष्याच्यादृष्टीनं आम्ही काम करु. मी ग्वाही देते की मुलांचं आरोग्य आणि त्यांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळं काळजीपूर्वक निर्णय घेतले जातील"


दरम्यान, राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि अकोला या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहावी-बारावीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. ऑफलाईन परीक्षा रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. वर्षभर ऑनलाइन शिकवलं, तर मग परीक्षाही ऑनलाईन घ्या. तुम्ही वर्षभर ऑनलाइन शिकवता आणि ऑफलाइन परीक्षा घेता, हे योग्य नाही. त्यामुळे परीक्षा रद्द करा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी रेटून धरली आहे.

Comments
Add Comment