नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जोर कमी होत असला तरीही देशात गेल्या काही दिवसांपासून दररोज २ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे धोका कायम आहे.
मागील २४ तासांमध्ये देशात २ लाख ९ हजार ९१८ बाधितांची नोंद करण्यात आली आहे. सध्या देशात १८ लाख ३१ हजार २६८ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर संसर्गाचा पॉझिटीव्हीटी दर हा १५.७७ टक्के इतका झाला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत ९५९ जणांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. तर, २ लाख ६२ हजार ६२८ जणांनी कोरोनाच्या आजारावर मात केली आहे. देशात १,६६,०३,९६,२२७ जणांना कोरोना लशीचे डोस देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात रविवारी २२ हजार ४४४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. तर ३९ हजार ०१५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१४ टक्के इतका झाला आहे. रविवारी राज्यात ५० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
राज्यातील मृत्यूदर १.८५ टक्के एवढा आहे. राज्यात २,२७,७११ इतके सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७७,०५,९६९ इतकी आहे.