नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. यात त्यांनी चालू आर्थिक वर्षात विकासदर (जीडीपी) ९.२ टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच पुढच्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर कमी होऊन तो ८ ते ८.५ टक्के इतका राहील, असे म्हटले आहे. कोरोना संकटातून अर्थव्यवस्था पूर्णपणे सावरली असल्याचा दावा या आर्थिक पाहणी अहवालात करण्यात आला आहे.
देशाचा आर्थिक पाहणी अहवालासंदर्भात सविस्तर माहिती प्रमुख आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत. सेवा क्षेत्रात वाढीचा दर हा ८.९ टक्के राहील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
येत्या महागाईचा दर नियंत्रणात राहील असं सांगितलं असलं तरी बाहेरून आयात करण्यात येणाऱ्या मालामुळे महागाईवर प्रभाव पडेल असं सांगण्यात आलं आहे. कृषी क्षेत्रात ३.९ टक्के वाढ गेल्या आर्थिक वर्षात झाली. तर उद्योग क्षेत्रात ११.८ टक्क्यांची वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे.